पुणे : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचे शुटिंग केले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओत तिने माझ्याकडून लाल महालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असे मत व्यक्त केले आहे.
वैष्णवी पाटील म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रष्ठ जिजाऊंच्या लाल महालात चंद्रा लावणीवर डान्स व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करताना त्यावर वाद होईल असे काहीच माझ्या मनीध्यानी आले नव्हते. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ बनवायला गेले होते. कुणाचेही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचे मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळले आहे.”
View this post on Instagram
“ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळले त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलीट केला. परंतू मी तो व्हिडीओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला. मी सर्वांना तर सांगू शकत नाही, पण मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ डिलीट केला. आत्ताही मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत आहे,” अशी माहिती वैष्णवी पाटीलने दिली.