नाशिक : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात आंदोलन करण्यात आले. या उपहासात्मक आंदोलनात राष्ट्रवादीतर्फे सर्वसामान्य महिलांना चूल व लाकडे भेट देण्यात आलीत.
मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोदी सरकार झटका देत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत असून गृहिणीचे घरातील बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेक कुटुंबातील लोकांचे रोजगार बुडाले तर काहींना नोकरीपासून वंचित व्हावे लागले.
या महामारीतून जीवन पूर्वपदावर येत असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. मे महिन्यातच घरगुती गॅस सिलेंडर सह व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर दोनदा वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे खाणेपिणे महाग झाले आहे. या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक शहरात केंद्र सरकार विरोधात घोषणा देत सर्वसमान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन उपहासात्मक आंदोलन केले.