मुंबई (प्रतिनिधी) : ग्लेन मॅक्सवेलची अष्टपैलू खेळी आणि त्याला मिळालेली फाफ डु प्लेसीस, विराट कोहली या आजी-माजी कर्णधारांच्या धडाकेबाज सलामीची साथ या जोरावर बंगळूरुने अव्वल स्थानी असलेल्या गुजरातला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यातील विजयामुळे बंगळूरुने १६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे बंगळूरुला ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेशासाठी दिल्लीच्या शेवटच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
गुजरातच्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या बंगळूरुने धडाकेबाज सुरुवात केली. फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या आजी-माजी कर्णधारांच्या जोडीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना नकोसे करून सोडले. दोघांनीही दमदार कामगिरी करत बंगळूरुला विजयासमीप नेले. विराटने ७३ धावांची खेळी खेळली, तर फाफ डु प्लेसीसने ४४ धावांचे योगदान दिले. उरलीसुरली कसर ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केली. मॅक्सवेलने १८ चेंडूंत ४० धावांची नाबाद मोलाची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळूरुने हे आव्हान १८.४ षटकांत २ फलंदाजांच्या बदल्यात सहज पार केले. रवीश्रीनिवासन साई किशोरने ४ षटकांत अवघ्या २० धावा देत गुजरातला विजयी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची झुंज अपयशी ठरली. राशीद खानने २ बळी मिळवले, पण त्याला धावा रोखण्यात तितके यश आले नाही.
गुजरातसाठी गुरुवारी हार्दीक पंड्या तारणहार ठरला. शुबमन गील, मॅथ्यू वेडच्या अपयशानंतर हार्दीक पंड्याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत गुजरातला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पंड्याने ४७ चेंडूंत नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याला डेव्हीड मिलर आणि वृद्धीमान साहाने साथ दिली. मिलरने ३४ तर साहाने ३१ धावांचे योगदान दिले. राशीद खानने १ चौकार आणि २ षटकार ठोकत ६ चेंडूंत नाबाद १९ धावा ठोकल्याने तळात धावांच्या गतीने वेग घेतला. त्यामुळे गुजरातने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १६८ धावांचे लक्ष्य उभे केले. बंगळूरुच्या वानींदू हसरंगा डी सिल्वाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटके फेकत केवळ २५ धावा देत १ बळी मिळवला, तर ग्लेन मॅक्सवेलने ४ षटकांत २८ धावा देत १ बळी मिळवला.