Saturday, May 10, 2025

महामुंबई

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात केले पहिले अवयवदान

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात केले पहिले अवयवदान

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रुग्णालयात बुधवारी करण्यात आले. समाजसेविका अॅड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला आदर्श घालून दिला. अॅड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले.


अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांना जे. जे. रुग्णालयात १५ मे पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेंदू सर्जरी विभागप्रमुख डॉ. वर्णन वेलहो यांचे पथका त्यांच्यावर उपचार करीत होते. बुधवार १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान डॉक्टरांनी बनसोडे यांना ब्रेन डेड घोषित केले होते.


त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना समाजसेवा विभागामार्फत संपूर्ण माहिती देऊन अवयवदानाबद्दल अवगत करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरू केली. रुग्णाची किडणी, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान करण्यात आले.


मुंबईमधील जे. जे. हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल येथील गरजू रुग्णांना नियमानुसार हे अवयव देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या हॉस्पीटलमधील गरजू रुग्णाला छोट्या आतड्याची आवश्यकता होती. झेडटीसीसीच्या नियम आणि मार्गदर्शक सुचनेनुसार कोवीड-१९ नंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान आहे.

Comments
Add Comment