शोष खड्ड्यांमुळे गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात?

डहाणू, पालघरमध्ये त्वचाविकार, पोटाचे विकार बळावणार


संदीप जाधव


पालघर : पालघर जिल्ह्यात प्रशासनामार्फत हागणदारीमुक्तीचा नारा देताना नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचू लागला आहे. वैयक्तिक शौचालय, घरातील सांडपाण्याचे शोष खड्डे याद्वारे दूषित पाणी गावातील पाणी स्त्रोतांमध्ये मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विहिरी, विंधन विहिरी अशा प्रमुख स्त्रोतांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी आढळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.


डहाणू, पालघर या तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टी लगत असलेल्या गावांमध्ये दाटीवाटीच्या वस्त्या व घरे आहेत. याठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे प्रशासनामार्फत शासनाच्या धोरणानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याची योजना अंमलात आणली. त्यानुसार ग्रामपंचायतनिहाय ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशांना शौचालय देण्याची योजना राबवली.


ही योजना राबवताना शौचालयातील मलिद्याचा खत म्हणून उपयोग व सांडपाणी जमिनीत पुनर्भरण व्हावे यासाठी शोष खड्डे याचे तंत्रज्ञान वापरले. मात्र हे तंत्रज्ञान फोल ठरत आहे. जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत असताना शोषखड्ड्यातील सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या पाणी स्त्रोतांना जाऊन मिसळत असल्यामुळे हे स्त्रोत दूषित होऊ लागल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे हे पाणी पिल्यास किंवा वापरल्यास नागरिकांना त्वचारोग, पोटाचे विकार बळावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या प्रकाराबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या एका बैठकीमध्ये एका लोकप्रतिनिधीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र प्रशासनाने एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने ती सोडून दिल्यासारखे केले आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर आजतागायत उपाययोजना झालेली नाही.


किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावांमध्ये व परिसरामध्ये १५ ते ३० फूट खोलीवर पाणी स्त्रोत उपलब्ध होतात. तसेच तेथील जमिनीची लवकर पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे शोष खड्डे यातील पाणी लवकर मुरते व भूगर्भातील झऱ्यांसोबत ते लगतच्या पाणी स्त्रोतांना मिसळते. त्यामुळे दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी आढळते, असे काही ग्रामस्थांनी म्हटले आहे.


शोषखड्डे हे उपयुक्त असले तरी दाटीवाटीच्या वस्त्यांसाठी व विशेषतः किनाऱ्यालगतच्या गावांच्या आरोग्यासाठी ते घातक व मानवी जीवनावर दुष्परिणाम करणारे आहेत. त्यामुळे यावर प्रशासनाने पर्याय शोधणे आवश्यक आहे. - सचिन वर्तक, उपसरपंच, एडवण ग्रामपंचायत


अशा समस्या निर्माण होणाऱ्या गावांमध्ये किंवा परिसरामधील पाणी स्त्रोतांच्या पाणी नमुने तपासणी करून घेतले जातील. पुढील अहवाल आल्यानंतर किंवा स्त्रोत दूषित आढळल्यास तातडीने उपाययोजना आखल्या जातील. - अतुल पारसकर, विभागप्रमुख, स्वच्छ भारत मिशन, पालघर

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार