केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ मधील आपल्या पहिल्याच हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. बलाढ्य लखनऊचा संघ प्लेऑफच्या तिकीटापासून फक्त एक विजय दूर आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतरही इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
मुंबई (प्रतिनिधी) : कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या अंधुक आशा जिवंत ठेवण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज आहे, तर आधीच एक पाऊल पुढे असलेला लखनऊ सुपर जायंट्स बुधवारी हा सामना जिंकून गुजरातनंतर अधिकृतरीत्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि जरी संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला, तरीही त्यांना प्लेऑफकरिता पात्र होण्यासाठी इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
लखनऊचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे. संघाचे १३ सामन्यांतून १६ गुण आहेत आणि या सामन्यातील विजयामुळे त्यांचे प्लेऑफचे तिकीट निश्चित होईल. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाताचा संघ गत वर्षी अंतिम फेरीत पोहोचला होता. पण या हंगामात त्यांना ही गती कायम ठेवता आली नाही. मात्र, गेल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवून संघाने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
लखनऊला या सामन्यात सलग दोन पराभवांची साखळी तोडायची आहे. या दोन्ही सामन्यात फलंदाजांनी निराशा केली असून ते कर्णधार लोकेश राहुलवरच जास्त अवलंबून आहे. मात्र गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले आहे. अनुभवी क्विंटन डी कॉकच्या बाबतीतही असेच आहे. गेल्या दोन डावांत त्याने केवळ ११ आणि ७ धावा केल्या आहेत. मात्र, संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणजे दीपक हुडा सातत्याने धावा करत आहे. मोसमातील बहुतांश सामन्यांमध्ये संघाची गोलंदाजी चांगली होती. लखनऊला या सामन्यात विजयाची नोंद करायची असेल, तर आवेश खान, मोहसीन खान, जेसन होल्डर आणि रवी बिश्नोई यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल.
दुसरीकडे, आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळामुळे आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे कोलकाताने गेल्या सामन्यात हैदराबादचा ५४ धावांनी पराभव केला; परंतु फलंदाज अजिंक्य रहाणेचा संघर्ष सुरूच असून पॅट कमिन्समागोमाग आता तोही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडली आहे. शिवाय गेल्या मोसमातील नायक व्यंकटेश अय्यरनेही यंदाच्या मोसमात निराशा केली आहे. नितीश राणा व श्रेयस अय्यर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर उमेश यादवने टीम साऊदीला चांगली साथ दिली आहे. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडीलाही गेल्या काही सामन्यांमध्ये गती मिळाली असून गोलंदाजीत ते महत्त्वपूर्ण कामगिरी बाजवू शकतात. यंदाच्या गत सामन्यात लखनऊने कोलकाताला ७५ धावांनी शिकस्त देऊन गुणतालिकेत पाहिल्या स्थानी झेप घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा लखनऊचा मानस असेल.
ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता