Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीजैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

संघ मुख्यालय रेकी प्रकरणी करणार चौकशी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयात रेकी केल्याप्रकरणी नागपूर एटीएसने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख याला अटक केली आहे. एटीएसने रईसला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे.

नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रईस अहमद असदुल्ला शेख याने १४ जुलै २०२१ रोजी नागपूरच्या रेशमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. रेकी जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेवरून रईसने ही केली होती. अन्य एका प्रकरणात, जम्मू-काश्मीर पोलिसांनी रईस अहमद असदुल्ला शेखला हँन्ड ग्रेनेडसह अटक केली होती. चौकशीदरम्यान रईसने संघ मुख्यालयात रेकी केल्याची कबुली दिली होती. विमानाने मुंबईमार्गे नागपुरात पोहोचलेल्या रईसने नागपुरातील अनेक ठिकाणचे फोटोग्राफी आणि व्हिडीओ काढून पाकिस्तानात बसलेल्या आपल्या दहशतवादी कमांडरला पाठवले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलिसांनी नागपूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर नागपूर पोलिसांनी शहरातील संवेनशील परिसरांची सुरक्षा व्यवस्था कडक केली. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता नागपूर एटीएसने रईसला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा येथील रहिवासी असलेल्या रईसला जैश-ए-मोहम्मदचा कमांडर उमर याने एप्रिल 2021 मध्ये संघ मुख्यालयाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर, 13 जुलै 2021 रोजी रईस मुंबईमार्गे विमानाने नागपूरला पोहोचला. त्यानंतर 14 जुलै रोजी नागपुरातील महाल परिसरात असलेल्या संघ मुख्यालयाची रेकी करण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु, त्याला यश मिळू शकले नाही. त्यामुळे त्याने रेशमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केली. यादरम्यान रईसने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ स्पष्ट नसल्याने त्याला पुन्हा रेकी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रईसने चौकशीत सांगितले की, पोलिसांची उपस्थिती आणि मोबाईल डेटा संपल्यामुळे तो दुसऱ्यांदा रेकी पूर्ण करू शकला नव्हता आणि त्याला परत जावे लागले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -