Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजचुकलेला निर्णय

चुकलेला निर्णय

अॅड. रिया करंजकर

मुलगी जन्माला आल्यापासून आई-वडिलांना तिच्या भविष्याची चिंता लागून राहते. हे तर आज सर्वच समाजातील आई-वडिलांच्या बाबतीत असते. मुलाचे लाड पुरवले जातात आणि मुलीच्या भविष्याचा विचार करून तिला मात्र अनेक बंधने घालून घरांमध्ये जखडले जाते. काहीवेळा मुलींची पुढील भविष्य उज्ज्वल, तर काहींच्या बाबतीत मात्र निर्णय घेतल्यामुळे भविष्य अंधारात चाचपडत राहतात. चुकीच्या दिशेने पाऊल पडल्यामुळे अनेक मुलींची आयुष्य बरबाद झालेली आपण समाजामध्ये बघतो. काही मुली आपल्या आयुष्यात वाईट स्वप्न समजून कणखरपणे उभे राहतात व काही अक्षरश: कोलमडून पडतात.

रंजना आई-वडिलांची सर्वात लाडाची मुलगी. तिच्या आई-वडिलांना चारही मुली, मुलगा नाही, पण चारही मुलींना त्यांनी मुलाप्रमाणेच वाढवलं खास करून रंजनाला. स्त्री आपला शेवटचा मुलगा असं समजते, कारण ती सर्वात शेवटची मुलगी होती. पण चार मुलींना त्यांनी आपल्या पायावर शिक्षण देऊन उभं केलेलं होतं. आई-वडिलांनी आपलं कर्तव्य अचूक कळलेलं होतं. कधी आपल्याला मुली आहेत म्हणून नशिबाला दोष देत बसले नाहीत. आपल्या मुलीच आपल्याला सांभाळतील, असा ठाम विश्वास रंजना यांच्या आई-वडिलांचा होता. तिन्ही मुलींची लग्न झाली होती. आपापल्या संसारात रममाण होत्या, एवढंच नाही तर त्यांच्या तिन्ही मुली चांगल्या होत्या.

रंजनाला त्यांनी मुलगी न समजता मुलाप्रमाणेच वाढवलं होतं. तिला रंजनाऐवजी राजू असे ते म्हणायचे. तिचं वय वाढत चाललेलं होतं. अनेक मागण्या तिला येत होत्या. पण परस्पर ती काही ना काही कारण सांगून स्वतः लग्न मोडत होती. घरच्यांना वाटत होतं की, आई-वडिलांसोबत कोण असेल, आई-वडिलांचं कोण करत असेल, या काळजीपोटी रंजना अशी करते. आई-वडिलांची, बहिणींची आणि नातेवाइकांची अशी समजूत झालेली होती. कारण वडील रिटायर झाल्यानंतर वडिलांचे सगळे आर्थिक व्यवहार तीच बघत होती. वडिलांनी आपले सर्व्हिस काय मिळत होती, ती चार मुलींमध्ये समान-समान वाटणी केलेली होती आणि रंजनाच्या आयुष्यातला भाग त्याने तिच्या नावे बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमधून ठेवलेले होते.

३० वय उलटून गेलं होतं. तरीही रंजना लग्नाच नाव काढत नव्हती आणि एक दिवस अचानक तिने आपल्या मोठ्या बहिणीला मी लग्न केलंय असा फोन केला. असं ऐकून तिच्या मोठ्या बहिणीला धक्का बसला. आपल्या आई-वडिलांना कसं समजवायचं ते तिला समजेना आणि मुख्य म्हणजे हिने कोणाशी लग्न केले, तेही तिला कळेना म्हणून तिने घरातील सगळ्या लोकांना कळवलं आणि नंतर तिला फोन करण्यात आला. कोणाशी लग्न केलं विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की, ती जिथे काम करत होती त्याच्याबरोबर लग्न केलं. सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तो तिचा बॉस होता. घरातल्या लोकांचा परिचयाचा होता आणि मुख्य म्हणजे त्या बॉसच पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्याला मुलगीही होती. बॉसच्या बायकोने रंजनाच्या आई-वडिलांच्या इथे येऊन मोठा तमाशा केला व त्यांना धमकी दिली मी माझ्या जीवाचे काहीतरी करेन आणि तुम्हा सर्वांना तुरुंगात पाठवेन. तुमच्या मुलीचे माझ्या नवऱ्यासोबत अनेक वर्षे संबंध होते, असं ती बोलू लागली. त्यावेळी रंजनाच्या घरातल्या लोकांना समजलं की, ती एवढी लग्न का मोडत होती. त्या बॉसच्या पत्नीची समजूत घालून तिला परत पाठवण्यात आलं व रंजनाच्या मोठ्या बहिणीने रंजना व तिच्या बॉसला बोलून घेतलं व घरातील मंडळींनी मीटिंग घेतली आणि सांगितलं की, आमच्या मुलीला मी परत घेतो. त्यावेळी रंजना यायला तयार नव्हती, कारण ती प्रेमात आंधळी झाली होती. तिची बहीण तिला बोलत होती आम्ही तुझं लग्न करून दिलं असतं. जर यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतला असता, तर त्याची पहिली पत्नी असताना तुझं लग्न आम्ही कसं मान्य करायचं, तरीही रंजना ऐकायला तयार नव्हती. ऐकत नाही तर काय करणार, या हिशोबाने त्याने तो विषय तिथेच सोडून दिला आणि तिचं नशीब असं समजून सर्वजण मागे निघाले.

रंजनाच्या आई-वडिलांना, बहिणीला असं समजलं की, रंजनाचे ब्रेन वॉश केले होते कारण, बॉसला पैशाची गरज होती आणि रंजनाच्या बँकेत तिच्या वडिलांनी तिच्या नावे भली मोठी रक्कम ठेवलेली होती आणि त्याच्यावर त्या बाॅसचा डोळा होता. ही गोष्ट काही दिवसांनी रंजनाला समजली तेव्हा तिचा नवरा तिच्याकडून सतत पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी आणि त्याच वेळी नेमकं रंजनाच्या बहिणीने तिची समजूत काढली की, तू त्याला पहिला पत्नीपासून घटस्फोट घ्यायला सांग आणि मग तुझे आम्ही व्यवस्थित लग्न लावतो. पण तो तसे करायला तयार नव्हता. त्याला त्याची पहिली बायको सोडायची नव्हती, यावरून हळूहळू रंजनाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. कारण, आपण आयुष्यभर याची ठेवलेली बायको म्हणूनच लोक आपल्याकडे बघणार आणि आपल्या खात्यातले सगळे पैसे हा काढणार आणि आपल्याला सोडून देणार. हा डाव रंजनाने उशिरा का होईना, पण ओळखला आणि त्याच्या तावडीतून पलायन करून आपल्या आई-वडिलांकडे आली.

हे तिच्या बॉसला समजल्यावर रंजनाच्या आई-वडिलांना आणि बहिणींना धमकी देऊ लागला, तुमच्या बहिणीचे आयुष्य मी बरबाद करेन. मी तिच्याशी लग्न केले असून माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे, असे तो बोलू लागला. रंजनाच्या बहिणीने सरळ सांगितलं की, तुझी पहिली पत्नी असताना दुसरे लग्न कोणत्याही कायद्यात मान्य केलं जात नाही, तुला जे करायचे ते कर. आम्ही त्यासाठी खंबीर उभे आहोत आणि रंजनालाही तिच्या बहिणीने तिच्या आई-वडिलांनी मानसिक आधार दिला. या घडलेल्या चुकीच्या प्रसंगातून ती उभी राहावी म्हणून तिचं कौन्सिलिंग करण्यात आलं, तरी रंजना स्वतःच्या चुकांमधून सुधारून उभी राहत आहे. कशी आणि कशा प्रकारे फसले गेलो, याचाही विचार ती करत आहे.

रंजनासारख्या अनेक मुली आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये असतात आणि पुरुषांच्या जाळ्यात अचानकपणे खेचल्या जातात आणि आपले आयुष्य बरबाद करून बसतात.

(कथा सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -