मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील वृक्षांची योग्य प्रकारे जोपासना कशी करावी?, आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी कशी करावी? व छाटणी करताना पक्ष्यांच्या घरट्यांची कशी काळजी घ्यावी? आदी पैलूंसंदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञांकडून बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, तसेच कंत्राटदारांकडे असलेले उद्यान विषयक तज्ज्ञ व त्यासोबत मुंबईतील ज्या आस्थापनांकडे उद्यान विषयक तज्ज्ञ आहेत, अशा मुंबईतील बहुतांश उद्यान विषयाशी निगडित अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय वृक्षतज्ज्ञ परिषदेमार्फत प्रमाणित वृक्षतज्ज्ञ वैभव राजे व इतर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. पावसाळ्यात करण्यात येणारी वृक्षांची छाटणी/कापणी याविषयी मार्गदर्शनपर सत्रासह प्रात्यक्षिक देखील यामध्ये समाविष्ट होते.
उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार यांनी मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना वृक्ष छाटणी करताना नागरिकांच्या व कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन कक्ष व विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्ष यांच्याशी समन्वय साधून मुंबईकरांना जास्तीत-जास्त योग्य प्रकारे सेवा देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.