Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला...

जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला…

मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे रविवारी १ मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. अश्रूंची झाली फुले, एखाद्याचे नशीब, साष्टांग नमस्कार, वसंत सेना, गाढवाचं लग्न, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा अनेक नाटकांतून त्यांनी लोकप्रिय भूमिका केल्या. एकता कल्चरल अॅकॅडमीकडून जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नव्वदीच्या दशकात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या अकाली जाण्याने सिनेजगताला आणि चाहत्यांना अत्यंत दुःख झाले.

पूर्णिमा शिंदे

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि रंगभूमीच्या पूजक आपल्या सर्वांची लोकप्रिय ज्येष्ठ, गुणी अभिनेत्री. धुमधडाका सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर अंबाक्का म्हणजे प्रेमा ताई किरण यांची ही भूमिका खूप गाजलेली. अर्धांगिनी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं. धुमधडाका, दे दणादण, गावरान गंगू, उमंग, उतावळा नवरा, हिरवा चुडा, गाव थोर पुढारी चोर, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांतून नावारूपाला आलेली अभिनेत्री.

मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. अश्रूंची झाली फुले, एखाद्याचे नशीब, साष्टांग नमस्कार, वसंत सेना, गाढवाचं लग्न, लवंगी मिरची कोल्हापूरची अशा अनेक नाटकांतून त्यांनी लोकप्रिय भूमिका केल्या. एकता कल्चरल अॅकॅडमीकडून जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नव्वदीच्या दशकात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या अकाली जाण्याने सिनेजगताला आणि चाहत्यांना अत्यंत दुःख झाले.

माझा व प्रेमाताईचा संबंध आला, तो वीस वर्षांपूर्वी. खरंतर त्या माझ्या आईची मैत्रीण पाहता-पाहता माझी मैत्रीण कशा झाल्या समजलेच नाही. त्यांचा गोड आवाज, मनमिळावू, हरहुन्नरी अत्यंत गोड, लाघवी स्वभाव कधीच गर्व नाही. आज त्या कितीतरी नावारूपाला आल्या, यशस्वी झाल्या, तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवरच ह़ोते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, संघर्षमय, खडतर जीवन प्रवासातून नागपूरहून त्या आल्या. प्रथम दूरदर्शनवर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले त्यापूर्वी त्यांनी गावोगावी दोन हजारांहून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला. संगीतनाट्य, लोककला, गायन, नृत्य आणि सिनेमा यातील अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी ही गुणी अभिनेत्री. माणूस म्हणून अत्यंत संवेदनशील, प्रामाणिक, हरहुन्नरी, हौशी मनमिळावू.

पंधरा वर्षांपूर्वी मी त्यांना माझ्या ऑफिसमध्ये ॲकॅडमीमध्ये अभिनयाचे व्याख्यान देण्यासाठी बोलावले असताना त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांना खूपच आनंद दिला. त्या नेहमी मला हट्टाने म्हणत असत, “तू मला भाषण शिकव.” मी त्यांना म्हणत असे, “अंबाक्का तुम्ही मला नृत्य शिकवा.” आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी झालो. निरागस, उत्सुक, प्रसन्न, मेहनती आणि नेहमी नवीन काही करण्याची आस व ध्यास असलेली जिद्दी, कार्यतत्पर आपल्या अभिजात कलेच्या बळावर, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रेमाताई. त्यांच्यासोबत मी खूप सारे कार्यक्रम केले. त्या प्रमुख पाहुण्या, तर मी निवेदिका असे. त्यांना माझ्या बोलण्याचे विशेष कौतुक असायचं आणि मला मात्र त्यांच्यातील माणूस, माणुसकी संवेदनशीलता हे गुण नेहमीच आवडायचे. कोरोना काळात त्या खूप घाबरल्या होत्या. जेव्हा आशालता वाबगावकर गेल्या तेव्हा म्हणाल्या, “पूर्णिमा माझी बायपास झाली आहे, भीती वाटते बाहेर जाण्याची…” तरीही अत्यंत जिद्दीने सिनेमात काम मात्र त्यांनी निरंतर सुरू ठेवलं. मालिका, भोजपुरी चित्रपट, दिग्दर्शक, असे व्यक्तिमत्त्व ताईंचे होते. कलाकार आणि माणुसकी असलेल्या हाडामासाची कला वरदान प्राप्त असलेल्या कलाकार म्हणून त्यांचा खूप हेवा वाटत असेल, पण त्यामागील त्यांची धडपड, खडतर प्रवास, संघर्षमय जीवनात सुखापेक्षा जास्त दुःखच अनुभवले. कारण, वडील गेल्यानंतर आईने सांभाळ केला. आई आणि बहीण गेल्यानंतर मामीने सांभाळ केला. मग मामीही निवर्तल्या. तीन वर्षांपूर्वी प्रेमाताईचा एकुलता एक चिरंजीव देवाघरी गेला. त्याची दोन चिमुकली मुले आणि आपल्या सुनबाईसोबत त्या जीवन कंठित होत्या. ‘कला हेच जीवन आणि जीवन हीच कला’ असे ब्रीद वाक्य असलेली प्रेमाताई सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील भूमिका मग ती गावरान, ग्रामीण-शहरी कोणतीही असो प्रेमळ वा खास्ट असो, प्रेयसी, सासू, बहीण आई ती वठवावी त्यांनीच. जीव ओतून, जीव लावून त्या भूमिकेत त्या जगायच्या.

२ ऑक्टोबर २१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एकाच व्यासपीठावर आम्ही प्रमुख पाहुणे होतो. त्याच वेळी २० ऑक्टोबरला माझा कार्यक्रम नवदुर्गा पुरस्कार संजीवन कला विकास प्रतिष्ठानतर्फे पत्रकार संघ नियोजित होता. मी त्यांना मौखिक आमंत्रण देताना त्या मला म्हणाल्या, “तुझा कार्यक्रम आहे, मला त्यात डान्स करायचा आहे! ‘पोलीसवाल्या सायकलवाल्या…’ गाण्यावर.” मला ही संकल्पना खूप आवडली. नवदुर्गा पुरस्कार वितरणाच्या प्रमुख पाहुण्या प्रेमाताई होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर दिग्गज मंडळी होती. तरीदेखील त्यांनी नृत्य सादर केले. त्यावर सर्व नाचले. सर्वांना सैराट, दे दणादण करणाऱ्या प्रेमाताई अजिबात दमल्या नाहीत. खूप अविस्मरणीय आनंदाचा क्षण होता तो दिवस. आम्ही कोणीच विसरू शकणार नाहीत. दुसऱ्या दिवशीही त्यांना फोन केला, “दिवाळीला ताई तुम्ही आमच्या घरी यायचं जेवायला नक्की!” यावर “काय गं अशी करते मी नांदेडला जाते, उद्यापासून शूटिंगसाठी नंतर नक्की येईल. भेटूया आपण.” ओटी जगदंबेची या चित्रपटासाठी त्या जाणार होत्या म्हणणारी प्रेमाताई अधून-मधून फक्त फोनवर बोलत राहिल्या. सीरियलमध्ये दिसल्या, पिक्चरमध्ये दिसल्या. पण मला न सांगताच आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्याला सोडून १ मे रोजी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक देवाघरी गेल्या. आमचा २७ मेचा साताऱ्याचा प्लॅन होता. पण एक मे सकाळीच ताई आपल्याला सोडून गेल्यामुळे अतिशय खंत वाटली.

इतक्या हौशी प्रेमाताई यश-अपयश, सुख-दुःख, जय-पराजय, मानापमान यातून जिद्दीने व कष्टाने त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःचे एक अव्वल असे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या सहवासात मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी कधीच कुणाला दुखविले नाही. एक अत्यंत नावारूपाला आलेली अभिनेत्री त्यांचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मोठेपण हे त्यांच्या प्रेमळ या नावात प्रेमळ अंत:करणात दडलेले होते. संघर्षमय खडतर प्रवासातून तावून सुलाखून निघालेली प्रेमाताई आपला पुन्हा जन्म अभिनेत्रीचा असावा, अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करते. आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र शब्द सुमनांजली…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -