मुंबई (प्रतिनिधी) : गेली कित्येक वर्षे मुंबईतील सखल भागात पाणी साचते. मुंबईतील असे काही भाग आहेत जिथे दर वर्षी कितीही उपाययोजना केल्या तरी पाणी साचते. मुंबईत पाणी साचण्याची एकूण ३६८ ठिकाणे आहेत, तर उपनगरात सर्वाधिक ठिकाणी पाणी साचते. यामुळे उनगरातील नागरिकांना जास्त धोका आहे.
दरम्यान मुंबई शहराच्या भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक सखल भाग पाण्याखाली जातात. यात मुंबई शहरांपेक्षा उपनगरात जास्त फ्लॅडिंग स्पॉट आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईत एकूण २५० फ्लॅडिंग स्पॉट होते, तर या वर्षी वाढून ३६८ फ्लॅडिंग स्पॉट आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे २४८ फ्लॅडिंग स्पॉट हे उपनगरात असून मुंबई शहरात १२० स्पॉट आहेत. त्यामुळे पाणी साचण्याचा सर्वाधिक धोका हा उपनगरातील नागरिकांना असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे येत्या पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला भरती असेल. यावेळी काही तासांत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर पाणी साचण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी पालिका उपाययोजना करणार आहे. मुंबईत ४०० पंप बसवण्यात येणार आहेत, तर प्रत्येक कार्यालयात अतिरिक्त दोन पंप देण्यात आले आहेत.