मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे एवढा मोठा शासकीय मालकीचा भूखंड रूस्तमजी ब्लिल्डराला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे. या व्यवहाराला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरुन कुणाचे आर्शिवाद आहेत, असा सवाल करीत हा १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.
आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची भाजपाकडून पोलखोल सभांच्या माध्यमातून करण्यात येत असून याच श्रुखंलेतील एक पत्रकार परिषद गुरूवारी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दादर भाजपा कार्यायालयात घेऊन ठाकरे सरकारच्या काळातील एक भूखंड घोटाळा उघड केला. शासकीय भूखंड कवडीमोल दराने सरकारने कसा विकला व भ्रष्टाचार केला याची कागदपत्रांसह आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पोलखोल केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात बँन्ड स्टँन्ड परिसरात असणा-या ताज हॉटेलच्या शेजारील १ एकर ५ गुंठे हा भूखंड सन १९०५ पासून ‘द वांद्रे पारसी कन्व्हॅलेसेंट होम फॉर वुमेन अँड चिल्ड्रन चॅरिटेबल ट्रस्ट’ भाडे पट्यावर देण्यात आला होता. आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी ही राखीव जागा या ट्रस्टला देण्यात आली होती. या ट्रस्टने सदर कामासाठी जागेचा वापर केलाच नाही. तर सदर जागेचा भाडेपट्टा हा १९८० साली संपला.
मुंबई महापलिकेच्या २०३४ च्या विकास आराखडयात या जागेचे आरक्षण पुनर्वसन केंद्र असे आहे. सदर ट्रस्टचा भाडेपट्टा करार संपल्यामुळे ही जागा सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया होत असतानाच २०२० साली ही जागा विकण्याची जाहीरात काढण्यात आली. व त्यानंतर २०२२ पर्यंत सरकारने ही जागा विकण्याच्या सर्व परवानग्या दिल्या. यामध्ये मंत्रालयातल सहाव्या मजल्यावरील कुठल्या मंत्र्यांच्या आर्शिवादाने हा व्यवहार करण्यात आला असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
रुग्ण सेवेसाठी देण्यात आलेला हा भूखंड सदर ट्रस्टने रुस्तमजी या विकासकाला विकला असून केवळ २३४ कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. जागेचे मुल्यांकन करणाऱ्यांनी या भूखंडाचे मुल्य ३२४ कोटी निश्चित केले जे बाजारमूल्यानुसार कमी आहे. त्यापेक्षा ही कमी २३४ कोटीला हा भूंखड विकण्यात आला. त्यामुळे स्टँपड्यूटी मधून शासनाला मिळणार महसूलही कमी मिळाला असून सदर जागेच्या मुल्याचे बाजारभाव आणि विकास नियंत्रण नियमावली नुसार मिळणाऱ्या एफएसआयचा विचार केला तर सर्व खर्च वजा करता या विकासकाला १ हजार ३ कोटी रुपये फायदा होईल. असे असताना केवळ २३४ कोटींना हा भूखंड विकासकाला मालकी हक्काने विकण्यात आला आहे. ऐतिहासिक वास्तू असा दर्जा दिलेली वास्तू या जागेत असताही हा भूखंड विकासकाला विकण्यात आला असून बिल्डरकडून ट्रस्टला केवळ १२ हजार चौरस फुट मिळणार आहे तर बिल्डरला विक्रीसाठी १ लाख ९० हजार चौरस फुट एवढे क्षेत्रफळ मिळणार आहे.