मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा जामीन मंजूर झाला असून अखेर १२ दिवसांनंतर नवनीत राणा तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना थेट लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलणे टाळले आणि केवळ हात जोडून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
खासदार नवनीत राणा यांची भायखळा येथील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने काल या दाम्पत्याला जामीन मंजूर केला. त्यामुळे या दोघांची आज तुरुंगातून सुटका होणार होती. त्यानुसार कोर्टाचा जामिनाचा आदेश घेऊन पोलिसांची एक टीम भायखळा तर दुसरी टीम तळोजा तुरुंगाकडे रवाना झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेचे अधिकारी आज पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या घरी दाखल झाले होते. दुपारी १२.५० वाजता अधिकारी राणांच्या घरी पोहोचले आणि १२.५५ ला बाहेर पडले. घरी कोणीही नसल्यामुळे पालिका अधिकारी पुन्हा माघारी फिरले. “आज राणा कुटुंबियांना कसलीही नोटीस दिलेली नाही. आम्ही आज केवळ पाहणी करण्यासाठी आलो होतो. याप्रकरणी आता राणा कुटुंबीय आम्हाला पत्र देतील त्यानंतर आम्ही पुन्हा पाहणी करायला येऊ,” असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.