कल्याण (प्रतिनिधी) : हिंदी भाषिक शिक्षकांसाठी २ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शिक्षक विशेष रेल्वे वाराणसीला रवाना झाली. कल्याण स्थानकात भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरमारे, कल्याण डोंबिवली मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, उमेश साळुंखे, राहुल खंदारे, नयन म्हारनुर यांनी शिक्षक प्रवाश्यांना गुलाबपुष्प देऊन प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात २ वर्षे ही ट्रेन बंद होती. मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय शिक्षक असल्याने शाळांना सुट्ट्या लागल्याने शिक्षकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रिझर्वेशन मिळत नव्हते. शिक्षकांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपा शिक्षक आघाडीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबईत भेट घेऊन टीचर्स स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते.
या मागणीच्या अनुषंगाने अखेर मध्य रेल्वेने या गाडीचे वेळापत्रक जाहीर केले. अनेक शिक्षकांनी २९ एप्रिलला दुपारी अडीच वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या रेल्वेचे आगाऊ तिकीट बुकिंग केले व त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.