
ठाणे (प्रतिनिधी) : देशातील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत असल्याने चिंता वाढली असून देशात चौथी लाट येणार का? या बद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यात पुन्हा एकदा चाचण्यांवर भर देण्यात येत असून दिवसाला दीड ते दोन हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या वतीने आखण्यात आले आहे.
यासाठी दोन लाख अँटीजेन चाचण्यांचे किट खरेदी करण्यात येणार आहेत. हे सर्व किट्स महापालिकेची चाचणी केंद्रे, आपला दवाखाना आणि पालिकेच्या आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने मधल्या काळात चाचण्यांचे प्रमाण देखील अतिशय कमी झाले होते. ठाणे शहरात दिवसाला केवळ १५० ते २०० चाचण्या होत होत्या.
मात्र रुग्णसंख्या वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी दोन लाख अँटीजेन किट्स आरोग्य केंद्रे, आपला दवाखाना, आणि टेस्टिंग केंद्रांना देण्यात येणार आहेत.
...तर कोरोना चाचणी बंधनकारक...
कोरोनाचा काही प्रमाणात वाढता प्रभाव लक्षात घेऊन आता खासगी हॉस्पिटलला देखील महापालिकेच्या वतीने परिपत्रक काढण्यात येणार आहे. यामध्ये तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांची कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय या खासगी रुग्णालयाला देखील त्वरित माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे.