मुंबई (प्रतिनिधी) : मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या आपल्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाम आहेत. राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे बंद झालेच पाहिजेत, असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ऐकणार आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला सत्तेवर बसवणारे बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकणार आहात का? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असेदेखील राज ठाकरे म्हणाले. दरम्यान आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
मशिदींवरचे भोंगे ४ मे पर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते; परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले आहे की, “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही.
प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल; परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल, असे ठाकरे म्हणाले.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.