Sunday, May 11, 2025

रायगड

मीनरलच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणी विक्रीचा गोरखधंदा जोरात

मीनरलच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणी विक्रीचा गोरखधंदा जोरात

उरण : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होत आहे. सध्या पिण्याचे पाणी विकत घेण्याचे फॅड वाढले. मात्र, विकत घेऊन मिळणारे पिण्याचे पाणी कितपत शुद्ध मिळते, याबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे.


परिसरात ठरावीक किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वीस लिटर जारमधील पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा होणाऱ्या नळातून भरून शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या माथी मारत असल्याचा धक्कादायक प्रकार या परिसरात घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.


अनेक नागरिक पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या तसेच हॉटेल, शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्येही वीस लिटर जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.


मात्र, सध्या कमी भांडवल व कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे.


ज्या ठिकाणी नगरपालिकेकडून नळाद्वारे वितरित होणारे पाणीच वीस लिटरच्या जारमध्ये भरून ‘मीनरल वॉटर’ च्या नावाखाली बिनधास्तपणे व्यवसाय सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन


बाटली बंद तसेच कॅनचे पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागही उदासीन दिसत आहे. यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या विभागाने पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासण्याची गरज आहे. त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी बोरमधील पाणी केवळ त्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच थंड करून ते विकले जाते. त्यात कोणते घटक आहेत, कोणते घटक नाहीत, याबाबत सामान्य ग्राहकांना माहिती नसते. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याचेच दिसून येत आहे.

Comments
Add Comment