Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखधोकादायक इमारतींना क्लस्टरची प्रतीक्षा...!

धोकादायक इमारतींना क्लस्टरची प्रतीक्षा…!

अतुल जाधव

पावसाळा जवळ आला की ठाणे शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा चर्चेला येतो. या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांना भविष्यात काय होणार या धास्तीने जीव टांगणीला लागतो. दरवर्षी धोकादायक इमारतींचा प्रश्न जटिल होत असताना या प्रश्नावर तोडगा म्हणून क्लस्टर अर्थात सामूहिक पुनर्विकास योजना पुढे आली. शहरातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दर्जेदार आणि अधिकृत घरांचा पर्याय म्हणून क्लस्टर योजनेकडे बघितले जात आहे. सध्या ठाणे शहरातील क्लस्टर योजनेची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अनेक शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ठाणे शहरा इतकाच कळीचा मुद्दा आहे. प्रमुख शहरातून क्लस्टरची मागणी होत आहे. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लस्टर योजनेचा श्री गणेशा केल्यानंतर या योजनेला अपेक्षित गती मिळणे अपेक्षित असताना काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. क्लस्टर योजनेतील संक्रमण शिबीर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना स्थलांतरित करून इमारती उभारण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतीही हालचाल नसल्यामुळे क्लस्टर योजना केवळ घोषणेपुरती होती का? असा असा प्रश्न पडला आहे.

ठाणे शहरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतींना पुनर्विकास कामात अडथळे निर्माण होत आहे. राजकीय आशीर्वाद, सरकारी यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे ऐंशी-नव्वदच्या दशकात ठाणे शहरात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली, डीसीआर बांधकामाचे सारे निकष गुंडाळून अनधिकृत बांधकामे करून इमारती उभ्या करण्यात आल्या. अनेक वर्षांनंतर या इमारती आता मोडकळीस आल्या असून त्यांना दुरुस्तीची अथवा पुनर्विकासाची गरज आहे; परंतु नियमामुळे या इमारतींचा पुनर्विकास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

पावसाळा तोंडावर येताच ठाण्यातील धोकादायक इमारतींचा मुद्दा समोर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. तरीही पावसाळ्यात इमारतींच्या दुर्घटना घडतात. आता ठाणे महापालिकेत ४ हजारांहून अधिक धोकादायक इमारती असल्याची माहिती मिळत आहेत. महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून नऊ प्रभागांमध्ये ४ हजार ३९७ धोकादायक इमारतींची नोंद आहे.

धोकादायक इमारतींपैकी अतिधोकादायक गटात ७१ इमारतींचा समावेश झाला असून या इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने अनेक रहिवाशांना अशा धोकादायक इमारतींमध्येच जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.

पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती नागरिकांना दिली जाते. सी १ या अतिधोकादायक प्रकारामध्ये शहरातील ७१ ते ७२ इमारती असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या इमारती तत्काळ रिकाम्या करून रहिवाशांना पर्यायी जागी स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे; परंतु महापालिकेकडे नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी घरे नाहीत. यामुळे अनेक रहिवासी धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे दिसून येत आहे.

धोकादायक इमारतींची नोंदीमध्ये मुंब्रा प्रभागात १,३७२, वागळेमध्ये १,०८२, दिवा प्रभागात ७४२, नौपाडा-कोपरी ४५३, लोकमान्य-सावरकरनगर २२१, कळवा १८३, उथळसर १३८, माजीवडा मानपाडा १४५ तर वर्तकनगरमध्ये ६१ इमारतींचा समावेश आहे.

कळवा पूर्व, पारसिकनगर परिसरात डोंगर उतारावर मागील काही वर्षांत हजारो झोपड्या बेकायदेशीररीत्या उभारण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात डोंगर उतारावरील झोपड्यांना दरडी कोसळण्याच्या अधिक धोका असतो, यापूर्वी देखील या परिसरात दरडी कोसळून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु नागरिक या परिसरातून स्थलांतरित होत नाहीत. पावसाळ्यात दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका खबरदारी घेत असते. या परिसरात ठाणे महापालिका रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावत असते. या वर्षी देखील अशा स्वरूपाच्या नोटिसा देण्यात आल्या असून महापालिकेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -