Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोविड रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी वोक्हार्ट हॉस्पीटलवर गुन्हा

कोविड रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी वोक्हार्ट हॉस्पीटलवर गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी) : वोक्हार्ट हॉस्पिटलने कोविड साथीच्या काळात प्लाझ्मा देणे व उपचाराच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी राहुल प्रकाश बोराडे (रा. दामोदरनगर, जेल रोड, नाशिक रोड) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंदविली होती. या फसवणूक प्रकरणी प्रारंभी दाद न मिळाल्यामुळे फिर्यादी बोराडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी आर्थिक फसवणूक आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

राहुल बोराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वडील प्रकाश दामोदर बोराडे (वय ६२) हे दि. १२ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कोविड आजाराच्या उपचारासाठी दाखल होते. यावेळी हॉस्पिटलच्या वतीने प्रकाश बोराडे यांना औषधाची फारशी गरज नसताना हॉस्पिटलच्या आर्थिक फायद्यासाठी विविध औषधांचे डोस देऊन निष्काळजीपणाने उपचार केले. तसेच रुग्ण बोराडे यांना प्लाझ्माची गरज आहे, असे सांगून ३० हजार रुपयांच्या दोन बॅगा असा प्लाझ्मा दिल्याची हॉस्पिटलच्या बिलात खोटी नोंद केली. मात्र या उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर प्रकाश बोराडे यांचे निधन झाले.

या उपचारापोटी हॉस्पिटलने बजाज अलायंझ लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून ५ लाख रुपये, फिर्यादी राहुल बोराडे यांच्याकडून ३ लाख रुपये, तसेच ऑनलाइन ट्रान्सफर पद्धतीने एक लाख रुपये रोख अशी नऊ लाखांची रक्कम उकळली. राहुल बोराडे यांनी न्यायालयात जाऊन या फसवणुकीचा सीआरपीसी १५६ (३) अन्वये तपास करावा, अशी मागणी केली होती. त्यावर प्रथम वर्ग चौथे सहन्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये वोक्हार्ट हॉस्पिटलविरुद्ध एकूण नऊ लाख रुपयांची फसवणूक व रुग्णाच्या मरणास कारणीभूत झाले, म्हणून हॉस्पिटलची संबंधित अधिकृत व्यक्ती आणि सुदर्शना पाटील (वडाळा नाका) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३०४ (अ) व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -