बोईसर (वार्ताहर) : विविध कारणांनी सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सखाराम सानप यांना बोईसर पालघर रोड येथील सतू ओरा गृहसंकुलातील सदनिकेमध्ये २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप व पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे.
एका शिक्षकाच्या बदली प्रस्ताव प्रकरणी लता सानप यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार शिक्षकाला लाच द्यायची नसल्याने त्यांनी तशी रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे केली. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पथकाने पालघर बोईसर रोड येथील सतूओरा या गृहसंकुलामधील राहत्या सदनिकेच्या जवळपास सापळा रचला व तक्रारदार शिक्षकाकडून तडजोडीअंती २५ हजारांची रोख लाच घेताना लता सानप यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही पुष्टी करून कारवाई केली.
लता सानप नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, पत्रकारांना भेटी न देणे, कर्मचाऱ्यांशी उद्धट व उर्मट वागणे, मनमानी कारभार तसेच अनेक प्रकरणात लाच मागणे अशी कामे त्या करत होत्या, अशी चर्चा आहे. अलीकडेच त्यांच्या बदलीचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. संपूर्ण प्राथमिक शिक्षण विभाग त्यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराज होता. याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक बिश्वास, पो. ह. संजय सुतार, नवनाथ भगत, पागधरे, अमित चव्हाण, विलास भोये, मांजरेकर, स्वाती तारवी, सखाराम दोडे या पथकांनी केली.