नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत म्हणून नवी मुंबई मनपाच्या अभियांत्रिकी विभागाने विविध निधीं अंतर्गत शहरातील बहुतांशी रस्त्यांवर लोखंडी ग्रील्स बसविले. परंतु मागील काही महिन्यांपासून या लोखंडी ग्रील्सना दुष्कृत्य करणाऱ्या घटकांचे ग्रहण लागले असून या ग्रील्सची भरदिवसा चोरी होत आहे. त्यावर पालिका अभियांत्रिकी विभागाने आपापल्या भागात चौकशी करून ग्रील्सच्या चोरीवर अंकुश आणावा. तसेच चोरी करणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईच्या विविध मुख्य व अंतर्गत रस्त्या शेजारील पदपथावर नागरिकांना सुरक्षितरित्या चालता यावे म्हणून आठही प्रभाग समिती व ११६ नगरसेवकांच्या निधी मधून लोखंडी ग्रील बसविण्यात आले. आता तर स्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत ग्रील्स बसविण्यास जोर आला होता. परंतु काही उपद्रवी घटकांकडून आता चक्क ग्रील्स मधील रोज चोरी होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी दिवसा लोखंडी ग्रील हलवून ठेवले जात आहेत.तर रात्रीच्या वेळेत पूर्ण ग्रीलच चोरीला जाऊ लागले आहेत.
नवी मुंबईत ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते त्या ठिकाणी सुद्धा ग्रील्सची चोरी होत आहे. या ग्रील चोरांना महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही द्वारे शोध लावता येऊन त्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकते. परंतु असेही होताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रील चोरांचे गोरख धंदा जोरदारपणे चालू आहे. यावर पालिका प्रशासनाने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नाहीतर काही दिवसांतच ग्रील मधील साहित्य दिसेनसे होईल व अख्खे ग्रीलच गायब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फायबरचे ग्रील बसवल्यास चोरी होणार नाही…
लोखंडी साहित्याला भंगार बाजारात चांगलाच दर आहे. त्यामुळे गर्दुल्ले सारखे घटक लोखंडी ग्रीलची चोरी करतात. पण त्यावर उपाय शोधत पदपथ किनारी फायबरचे ग्रील बसविले तर चोरी होण्याची शक्यता फार कमी असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मी स्वतः ग्रील संबंधी चोरी होते हे समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले होते. तसेच पालिकेला देखील लेखी कल्पना दिली होती. काही घटक प्रथम ग्रील हलवून ठेवतात. त्यानंतर अंधारात चोरी करतात. म्हणून पालिका प्रशासनाने यावर लक्ष ठेवावे व नुकसानी पासून दूर राहावे. सचिन शेलार, अध्यक्ष, माणुसकी युवा मंच, नवी मुंबई.
सर्व कार्यकारी अभियंत्यांना या बाबत पत्र काढण्यात येईल. तसेच ग्रीलची चोरी होणार नाही याची दखल घ्यायला सांगितले जाईल. संजय देसाई, शहर अभियंता, पालिका.