कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आचरा रोडवर कलमठ मच्छीमार्केटजवळ स्वामी रामेश्वर या खासगी बसला अपगात झाला. पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबावर आदळली. यामुळे वीजेचा खांब मोडला. वीजेच्या ताराही तुटल्या, तर एका पानटपरीचेही नुकसान झाले. तथापि, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ता ओला झाला होता. त्याचवेळी कणकवली पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर मुंबई ते आचरा जाणारी खासगी बस क्र. एम.एच.०९ एफ.एल.९०९९ च्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. त्यातच रविवार असल्याने कलमठ मासळी बाजारात गाड्या व माणसांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बस मच्छीमार्केटच्या आधी थांबणे गरजेचे होते, अन्यथा अनर्थ झाला असता. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी घेत असताना विजेच्या खांबावर बस चढली आणि अपघात झाला.
दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच दळवी कॉलनीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. तसेच रस्त्यावरील गर्दी कमी करत रस्ताही मोकळा केला.