सीमा दाते
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक येऊन ठेपलेली असताना मुंबईत राजकीय पक्षांची गोंधळ पाहायला मिळतो आहे. मात्र यात मुंबईकरांचे प्रश्न बाजूलाच राहिले आहेत, त्याकडे सत्ताधारी लक्ष देणार की नाही, असा सवाल आता मुंबईकर विचारतो आहे.
सध्या मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात राडे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर त्यातच आता हे राडे हाणामारीवर ठेऊन ठेपले आहेत. खरं तर भाजप नेत्यांवर झालेला हल्ल्याचे समर्थन नाहीच. मात्र या हल्ल्यात आणि राड्यांमुळे फायदा कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला होणार आहे हे नक्की. मात्र यात सामान्य मुंबईकर भरडला जातो आहे. मुंबईकरांना या राजकीय गोंधळाचे काही घेणे-देणे नाही. मात्र जो मुंबईकर मतदार आहे, त्याला त्याच्या समस्या सोडवणे जास्त महत्त्वाचे आहे.
आधीच मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. यामुळे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. मात्र यामुळे आधीच मुंबईतील विकासकामांवर उशीर झाला आहे, आयुक्तांनी शेवटच्या स्थायी समितीतील प्रस्ताव हळूहळू मंजूर केले आहेत. त्यामुळे दोन महिने व्हायला आले तरी विशेष अशा विकासकामांचे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना कोणी वाली आहे का? असा सवाल मुंबईकर विचारत आहे. एकीकडे मुंबईकरांच्या समस्या आणि दुसरीकडे महापालिका आगामी निवडणुका आहेत. मात्र राजकीय पक्ष केवळ निवडणुकांसाठी तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, गोंधळ, हल्ले या सगळ्यांत राजकीय पक्ष गुंग आहेत.
गेले काही दिवस मुंबईतील राजकीय वातावरण तापलेलेच पाहायला मिळत आहे, तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन केलेली भाषणे तर अनेकांना नकोशी झाली आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटायला सुरू झाल्या. ज्या पक्षात केवळ एक आमदार आणि एक नगरसेवक आहे असे बोलणाऱ्यांनी याच पक्षावर टीका सुरू केल्या, तर त्यानंतर हळूहळू सगळ्याच राजकीय पक्षांना हिंदुत्वाचा मुद्दा दिसला. मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुंबईत एकीकडे भाजप आणि मनसे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी आहे, विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाला भाजप आणि मनसे हे दोन पक्ष आवाहन देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे गेले कित्येक दिवस केवळ आरोप-प्रत्याराेप सुरू असलेल्या राजकारणाने काल वेगळे वळण घेतले. आधी भाजप नेता मोहीत कंबोज आणि नंतर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ले झाले. महत्त्वाचा विषय म्हणजे हे सगळं का सुरू आहे तर मुंबई महापालिका निवडणुकासाठी दोन्ही पक्षांची हाणामारी. राज्य सरकारने मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा प्रभाग रचनांचा आराखडा तयार करण्यास सांगितला आहे. त्यामुळे कधी ही निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या आगामी निवडणुकीत यंदा कोणाची सत्ता येणार यासाठी दोन्ही पक्ष विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना जोरदार प्रयत्न करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून शक्तिप्रदर्शन सुरू आहे की काय?
२०१७ च्या निवडणुकीत भाजपने अवघ्या काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागेच्या तफावतीमुळे मुंबईतील सत्ता काबीज करण्यास मागे राहिली. मात्र आता त्यांना सता मिळवायची आहेच. त्यातच गेले कित्येक वर्षे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आता राजकीय दुष्मनी झाली आहे. त्यामुळे ३० वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेकडे आता यावेळी सत्ता जाऊ नये म्हणून भाजपदेखील जोरदार कामाला लागली आहे. मग नालेसफाईच्या कामांची पाहणी काय, तर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार काय सगळे समोर आणण्यासाठी भाजप मेहनत घेत आहे.
सध्याचे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता – शिवसेना – ९९, भाजप – ८३, काँग्रेस – ३०, राष्ट्रवादी – ८, समाजवादी पार्टी – ६, मनसे – १, एमआयएम – २ आहे, तर २०१७ च्या निवडणुकीत मनसेतून ६ नगरसेवक गेल्याने शिवसेनेची संख्या वाढली होती. आताच्या महापालिका निवडणुकीत मात्र भाजप एकहाती सत्ता घेण्याच्या तयारीत आहेत, हे मात्र खरे. तर दुसरीकडे शिवसेना ही आपली गेल्या कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ देणार नाही, असे दिसत आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना अजून आहे हे दाखवण्यासाठीच की काय शुक्रवारी शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले.
काही दिवसांत मुंबईत पावसाळा सुरू होईल, त्यानंतर मुंबईकरांना अनेक समस्या भेडसावतील, ज्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता उपभोगली ते सध्या महापालिकेत नाही तर दुसरीकडे आयुक्तांकडून अनेक मोठे प्रस्ताव उशिरा मंजूर करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोंधळात मुंबईकरांच्या समस्या सुटतील की मुंबईकर आणखी समस्येत पडेल याचा प्रश्न निर्माण झाला आहे.