डॉ. सर्वेश सुहास सोमण
या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. त्यानंतर मंगळवारच्या सत्रात निर्देशांकानी या आठवड्यातील नीच्चांकी पातळी गाठली. गुरुवारच्या सत्रात पुन्हा एकदा शेअर बाजाराने बाऊन्स बॅक करत जोरदार उसळी घेतली. शुक्रवारी पुन्हा शेअर बाजारात घसरण होत निर्देशांकानी या आठवड्यासाठी देखील नकारात्मक संकेत दिलेले आहेत. आपण आपल्या मागील लेखातच निफ्टीची १७२३५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जर पातळी तुटली, तर निफ्टीमध्ये आणखी २०० अंकांची घसरण होऊ शकते हे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर निर्देशांक निफ्टीने मागील आठवड्यात १७००० ही पातळी तोडत १६८२४ हा नीच्चांक नोंदविलेला आहे.
सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा मंदीची असून तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार व्हर्लपूल, स्टार, आयजीएल या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची झालेली आहे. बहुचर्चित आयपीओ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी याच्या समभाग विक्रीबाबत येत्या काही आठवड्यात निर्णय होईल. केंद्र सरकारकडून मागील आर्थिक वर्षातच या समभाग विक्रीची योजना होती. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि त्यामुळे उद्भवलेल्या अनिश्चितता यामुळे ही भागविक्री पुढे ढकललेली होती. या आठवड्यात या आयपीओची तारीख या आठवड्यात निश्चित होऊ शकते. या आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चर्चा सत्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीबाबत बोलताना आभासी चलनाबाबत जागतिक स्तरावर नियमन आवश्यक असल्याचे सांगितले. खासगी आभासी चलनामुळे काळा पैसा पांढरा करणे, परदेशात पैसा पाठवणे, जागतिक दहशतवादी संघटनांना हा पैसा पाठवून त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे जागतिक पातळीवर विविध देशांच्या वित्तीय स्थैर्याला धोका उदभवू शकतो, असा सतर्कतेचा इशाराच दिला. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षापासून आभासी मालमत्तेच्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारणीचा प्रस्ताव या अर्थसंकल्पातून पुढे आणलेला आहे.
तसेच रिझर्व्ह बँक प्रस्तावित “सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सी” ही आपल्या स्वत:च्या चलनावर ठाम असून २०२२-२३ आपले डिजिटल चलन येऊ शकते. आपण आपल्या मागील २१ मार्च २०२२ रोजीच्या लेखामध्ये “जेके पेपर” या शेअरने २८५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून ३००.९० रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होणे अपेक्षित आहे” असे सांगितलेले होते. जेके पेपरमधील तेजी या आठवड्यात देखील कायम राहिली. आपण सांगितल्यानंतर या आठवड्यात देखील या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली. या आठवड्यात या शेअरने ३८७ रुपये हा उच्चांक नोंदवला. आपण सांगितल्यानंतर यामध्ये तब्बल ८७ रुपयांची वाढ दिसून आली आहे आणि टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत या शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५६६००० आणि निफ्टीची १७००० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जर या पातळ्या तुटल्या, तर निर्देशांकात आणखी मोठी घसरण होऊ शकते. शुक्रवारच्या सत्रात झालेल्या कामकाजानंतर अल्पमुदतीसाठी निर्देशांक करेक्शन अर्थात मोठ्या मंदीचे संकेत देत आहेत. चार्ट देत असलेले संकेत पाहता येणारा आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
येणाऱ्या आठवड्यात निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टी आणि बँकनिफ्टी यामध्ये आणखी मोठी घसरण पाहावयास मिळू शकते. ज्यामध्ये निफ्टी १६८०० पर्यंत घसरण दाखवू शकतो. निफ्टीने जर पुढील काळात १६८०० ही पातळी तोडली, तर मात्र निर्देशांक निफ्टीमध्ये आणखी ४०० ते ५०० अंकांची घसरण होऊ शकते.
मागील आठवड्याच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक शुगर कंपन्यांचे शेअर्स हे तेजीचे संकेत देत आहेत. ज्यामध्ये बलरामपूर चिनी, राणा शुगर, उगार शेअर, धामपूर शुगर हे शेअर्स तेजीमध्ये आहेत. त्यामुळे निर्देशांकातील पुढील घसरणीत अल्पमुदतीसाठी शुगर सेक्टरकडे पाहता येईल, असे सांगितलेले होते. या आठवड्यात शेअर बाजारात घसरण होऊन देखील शुगर क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७६०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते.
अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५२००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. अल्पमुदतीसाठी चांदी या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ६५००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत चांदीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
निर्देशांक हे पुन्हा एकदा करेक्शन अर्थात मंदीच्या अवस्थेत आहेत, त्यामुळे शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. आपण आपल्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निफ्टीची मध्यम मुदतीसाठी १७००० ही पातळी अत्यंत महत्त्वाची असून जर ही पातळी बंदतत्त्वावर तुटली तर मात्र छोट्या आणि मोठ्या सर्वच शेअर्समध्ये आणि निर्देशांकात मोठे करेक्शन येऊ शकते. त्यामुळे मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक करीत असलेल्या गुंतवणूकदारांनी या पातळीकडे लक्ष ठेवावे. प्रत्येक आठवडा हा गुंतवणुकीचा नसतो. काही वेळा शांत राहून योग्य संधीची वाट पाहणे हे महत्त्वाचे असते. घाई-गडबडीत केलेला व्यवहार हा आपल्याला नुकसान करून देण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबत संयम महत्त्वाचा आहे.