विलास खानोलकर
सातारा जिह्यातील नानाबुवा तांदुळवाडकर पंढरीचे वारकरी होते. एकदा ते श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आले. श्री स्वामींचे अद्भुत दिव्य तेज व आजानुबाहू मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. श्री स्वामी समर्थांपुढे भजन करावे, असे त्यांच्या मनात आले. तोच श्री स्वामी अकस्मात ते जेथे होते त्या बिऱ्हाडी आले. नानाबुवांस आनंद झाला. त्यांनी भजनास सुरुवात केली. सर्व श्रोतेजन प्रेमरसात बुडून गेले. नानाबुवा एक घटका निश्चेष्ट पडले. ते सावध झाल्यावर पुन्हा भजन करू लागले. भजनाची समाप्ती केली. नंतर त्यांना गणपतराव जोशी यांनी विचारले, “आपण एक घटका तर तटस्थ (निश्चेष्ट) का होता? ते कृपाकरून सांगावे.’’ त्यावर नानाबुवा म्हणाले, “निम्मे भजन झाल्यावर श्री स्वामी समर्थांनी आपले हे स्वरूप अदृश्य करून त्या जागी सावळी मूर्ती, पीतांबर परिधान केलेली, कटीवर दोन्ही हात ठेवलेली, मस्तकी मुकुट, कानी कुंडले, मनमोहक रूप धारण केले ते पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन मला समाधी लागली. माझे देहभान हरपले. पुढे काही वेळाने देहावर वृत्ती आली. तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले. श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. भक्तजनांचे उद्धारार्थ हा मानवी देह धारण करून आम्हा मूढ जनांचे ते तारण करीत आहेत यात संदेह नाही!’’
जय जय स्वामी समर्थ
वारकऱ्याला विठोबा समर्थ ।।१।।
वैष्णवाला विष्णु समर्थ
शैवाला शंकर समर्थ ।।२।।
गोकुळाला श्रीकृष्ण समर्थ
दत्तभक्तामध्ये स्वामीसमर्थ ।।३।।
साईनाथामधे स्वामीसमर्थ
नवनाथामधे स्वामीसमर्थ ।।४।।
अन्नपूर्णा देवीसह स्वामीसमर्थ
कोल्हापूरच्या अंबाबाई स्वामीसमर्थ ।।५।।
ब्रम्हाविष्णू महेशात स्वामीसमर्थ
श्रीगजानन महाराजात स्वामीसमर्थ ।।६।।
प्रत्येक मठामठात स्वामीसमर्थ
संत गोरा कुंभाराच्या माठात समर्थ ।।७।।
ज्ञानेशाच्या रेड्यात दत्तसमर्थ
देवळात प्रसन्न स्वामी समर्थ ।।८।।
रामपंचायनात स्वामीसमर्थ
हनुमानाच्या छातीत राम समर्थ ।।९।।
स्वामीभक्ताच्या हृदयातच समर्थ
विद्यार्थ्याच्या हृदयात समर्थ ।।१०।।
होमाहोमात दत्तगुरु समर्थ
स्वामीसप्ताहात सर्व वार समर्थ ।।११।।
आकाशात सूर्यचंद्रतारे समर्थ
स्वामी म्हणती भक्तांनो व्हा समर्थ ।।१२।।
मानवरूपी काया दिसली भक्तास
अक्कलकोटी केला यतीरूपी वास।।१३।।
पूर्ण ब्रह्मतुम्ही अवतरला खास
चैत्रमहिना स्वामीसमर्थाचा खास ।।१४।।