मुंबई : सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवत तुरुंगात असलेल्या नवनीत राणा यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप फडणवीसांनी केला.
हनुमान चालीसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका महिला खासदाराला अटक केली जाते आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. जर हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह असेल तर आम्ही दररोज राजद्रोह करायला तयार आहोत. लाजीरवाणी बाब अशी की मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना तुरुंगात पिण्याचे पाणी देखील दिले गेले नाही हे अत्यंत धक्कादायक आहे, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
“नवनीत राणांना तुरुंगात दिली जात असलेली वागणूक हा राज्याच्या लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. लोकशाहीबद्दल ओरडणारे आता आहेत कुठे? नवनीत राणा यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून लोकसभेच्या सभापतींकडे त्यांना तुरुंगात दिली जात असलेल्या वागणुकीबाबत तक्रार केली आहे”, असेही फडणवीस म्हणाले.