मुंबई : राज्यातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आणि मुंबईतील हल्ले मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत असल्याने राज्य सरकारकडून आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाने बहिष्कार टाकल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर फडणवीस यांनी निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, “आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले होते. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असे आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचे ठरवले असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.”