नागपूर : मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत भाजप खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी त्यांचे हनुमान चालिसा पठणाचा निर्धार रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करुन पळ काढणा-या पळपुट्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. प्रधानमंत्र्यांचा दौरा आहे. त्याची जबाबदारी महाराष्ट्राची, संपूर्ण देशाची असल्याचेही ते म्हणाले.
मातोश्रीवर घुसून हनुमान चालिसा वाचणं जणू आम्ही सत्यवादी महान योद्धे आहोत… असा आव आणला. मात्र, दौऱ्याला गालबोट लागू नये असे कारण सांगून त्यांनी पळ काढल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते, असे म्हणत ते म्हणाले की, बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी वातावरण गढूळ करत असून, राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचीही टीका त्यांनी केली. शिवसेनेचं हिंदुत्व घंटाधारी नाही तर, गदाधारी असल्याचे राऊत म्हणाले.
मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, असं ते म्हणतात. पण या दौऱ्याला जे गालबोट लाऊ इच्छितात त्यांचा समाचार घ्यायला शिवसेना पुढे असेल. ज्या हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले, मला त्यांचे कौतुक वाटते. शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी काही रुग्णवाहिका ठेवल्या होत्या असे म्हणत शिवसैनिकांचा मानवतावादी दृष्टीकोन पाहा, असे यावेळी राऊत यांनी स्पष्ट केले. हे भंपक बोगस लोक हिंदूत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.