अरुण म्हात्रे
उदगीर : रणरणत्या उन्हावर संमेलनाच्या आयोजकांनी उपाय मिळवले, पण राजकीय नेत्यांच्या सहभागावर त्यांना अंकुश ठेवता आला नाही. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या बरोबरीने संजय बनसोडे, सुभाष देसाई, अमित देशमुख, शिवाजीराव चाकूरकर पाटील, अशोक चव्हाण अशा डझनभर राजकीय नेत्यांची भाषणे सोसत अध्यक्ष भारत सासणे आणि मंडपात जमलेल्या ५०००० रसिकांना जेवणाची वाट पाहावी लागली. राजकीय मुद्दे साहित्यिक भाषेत मांडण्याचा खूप छान प्रयत्न झाले खरे. पण संमेलनाचे साहित्यिक स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार या संमेलनाच्या आडून मराठवाड्यातील जनतेपुढे आपली बाजू उजळ करण्याची संधी घेताहेत की काय, असा संभ्रम सर्वांच्या मनात उभा राहिला.
राजकीय नेत्यांची ही भाषणे कमी म्हणून की काय अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे मावळते अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ४० मिनिटे बोलून उद्घाटन सोहळा कंटाळवाणा करण्यास हातभार लावला.
आपला शेवटचा नंबर असलेले अध्यक्ष भारत सासणे यांनी नेटाने आपले अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण सादर करून संमेलनातील भाषणांची माळ पूर्ण केली. सकाळची ग्रंथ दिंडी, अरुण जाखडे पुस्तक प्रकाशन कट्टा, शांता शेळके कविता कट्टा, सुरेश भट गझल कट्टा आणि परिसंवाद हे कार्यक्रम नंतरच्या वेळात साजरे झाले. पण साऱ्यांना सकाळच्या सत्राच्या प्रचंड विलंबाची झळ सोसावी लागली.