सिंधुनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकरी, पशूपालकांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना कृषी व पशूपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान व विकसित यंत्रसामुग्री यांचे ज्ञान मिळावे; तसेच जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना विविध प्रकारची आधुनिक कृषी अवजारे, हत्यारे, उपकरणे, बी-बियाणे, प्रगत कृषी तंत्रज्ञान, दुग्धव्यवसायातील आधुनिक यंत्रसामुग्री, विविध उपकरणे, पशू व पक्ष्यांच्या विविध शुद्ध देशी, संकरीत व सुधारीत जातींबाबत माहीती मिळावी, प्रत्यक्ष त्या-त्या जातीची जनावरे व कृषी औजारे, उपकरणे पहावयास मिळावी, यासाठी ५ ते ८ मे या कालावधीत कुडाळ तहसिल कार्यालयानजिकच्या क्रिडा मैदानावर ‘सिंधु कृषी व पशू-पक्षी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, जिल्हा कृषिविकास अधिकारी सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते. अल्प शेती असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची शेती आणि शेती संलग्न विषयांचे प्रगत ज्ञान मिळाल्यास तसेच कृषी व पशू संगोपनाविषयी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान विकसित यंत्रसामुग्री यांचे ज्ञान आणि जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्त्व कळावे, याकरिता कृषी व पशुसंवर्धनाशी निगडीत आधुनिक यंत्र, उपकरणे व औजारे तसेच विविध जातींच्या पशू-पक्ष्यांचे चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करणे प्रस्तावित आहे. अशा कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांची व पशूपालकांची उत्पादन क्षमता वाढून त्याचा सामाजिक विकासावर प्रभाव पडतो.
सध्या अतिकष्ट करणारी पिढी दिसणे दुर्मिळ झालेली असल्याने सध्याच्या युवा वर्गाला कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राची आवड निर्माण व्हावी तसेच शेती व पशुसंवर्धन व्यवसायात नवनवीन आधुनिक, यांत्रिक व तांत्रिक पद्धतीचा अवलंब होऊन या क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हावा. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता कृषी व पशू- पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात कृषिविषयक विविध उत्पादक कंपन्यांकडील साहित्य, हत्यारे उपकरणे तसेच यंत्रसामुग्री यांचे एकत्रित दालन प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला सबलीकरणाचे धोरणानुसार जिल्ह्यातील बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या विविध स्पर्धा (उदा. सुदृढ गाय स्पर्धा, सुदृढ म्हैस स्पर्धा, सुदृढ बैल स्पर्धा, सुदृढ खांड स्पर्धा, सुदृढ कालवड स्पर्धा, सुदृढ पारडी स्पर्धा, सुदृढ शेळी स्पर्धा, सुदृढ मेंढी स्पर्धा, सुदृढ कुक्कूट स्पर्धा, दुग्ध स्पर्धा डॉग शो इत्यादी) आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागी व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाकरिता रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.