औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलला कापड बांधून गाडी थांबवली. त्यानंतर तुफान दगडफेक करत सुमारे दहा जणांच्या टोळीने गाडीत प्रवेश केला. यावेळी प्रवाशांचे मोबाईल, पाकिटे, पर्स आणि महिलांचे दागिने लुटून नेल्याची माहिती एका प्रवाशाने दिली.
यासंदर्भातील माहितीनुसार सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर दौलताबाद- पोटूळ स्थानकादरम्यान रेल्वे चालकाला सिग्नल बंद दिसले. दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधला होता. त्यांनी स्टेशन मास्तरला कळवले. तोपर्यंत रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाली. डब्यांमध्ये 9 ते 10 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाइल, पर्स आणि इतर साहित्य हिसकावले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही घटना कळली नाही.
गाडीतील सुमारे 6 ते 7 डब्यांमध्ये त्यांनी लुटमार केल्यानंतर पळ काढला. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. तिथे पोलिस चौकशीला सुरुवात झाली असून याबाबत दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट देण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.