नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरस बाधितांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या 24 तासांत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी राजधानीत कोरोनाची 632 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. याआधी सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकारात्मकतेचे प्रमाण घटले. सोमवारी सकारात्मकता दर 7 टक्के होता, तर मंगळवारी तो 4.42 टक्के होता.
बैठकीतील निर्णय…
- मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आला आहे.
- मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
- शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.
- लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे.
- डीडीएमएच्या बैठकीत शाळा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सरकार सामाजिक कार्यक्रमांवर बारीक लक्ष ठेवणार आहे.