Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे‘खारभूमी जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे दाखल करा’

‘खारभूमी जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे दाखल करा’

भूमिपूत्र शेतकऱ्यांची तीव्र निदर्शने

ठाणे (प्रतिनिधी) : कळवे येथील खारभूमीवर भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघर्ष कृती सेवा संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना केली.

कळवे येथील खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेकडो भूमिपूत्र शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. ‘महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, भूमाफियांवर कारवाई करा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांसह शेकडोंच्या संख्येने भूमिपुत्र शेतकरी उपस्थित होते.

दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली, भूमाफियांच्या जमीन कब्जाविरोधात शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी व खारभूमीवरील शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राखण्यासाठी सोमवारी ही निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी दशरथ पाटील यांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनीही खारभूमी विभागाने लेखी तक्रार करावी आम्ही भूमाफियांवर गुन्हा नोंदवून घेऊ असे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १९८५ साली सदर खारभूमी जमीन पाटबंधारे विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली तर २०१२ साली या खारभूमीचे विविध संस्थांना वाटप करण्यात आले. आता मनिषा नगर, गणेश विद्यालय, शिवदर्शन बिल्डींगच्या मागील बाजूने तसेच मुंबई-पुणे रोड, दत्तवाडी पूर्वेकडील रेल्वे व रस्त्यालगत भूमाफियांनी वॉल कंपाऊंड व बांधकाम करून खारभूमीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.

या भूमाफीयांनी मनीषा नगर बाजूने चाळी बांधल्या जात आहेत. हे शासनाच्या डोळ्यादेखत घडत असूनही दुर्लक्ष होत असल्याने भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. या भूमाफियांवर कारवाईसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निदर्शने करण्यात आल्याचे दशरथ पाटील यांनी सांगितले.

भूमिपूत्रांच्या खारभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या या भूमाफियांवर शासन-प्रशासनाने जर १० मे पर्यंत कारवाई न केल्यास व भूमिपूत्र शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास २५ मे पासून मुंबई येथील आझाद मैदानात प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशाराही दशरथ पाटील यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -