अॅड. रिया करंजकर
समाज आणि देश अत्याधुनिक सुविधांमुळे खूप प्रगतिपथावर गेलेला आहे. या आधुनिक सुविधांचा फायदा तरुणाईला होत आहे आणि काही गोष्टींचा गैरफायदा व नुकसानही सोसावे लागत आहे. तरुण पिढी मोबाइलमध्ये मान मोडेपर्यंत गुंतलेली आहे. मोबाइलच्या दुनियेमध्ये त्यांना आपल्या रक्ताच्या नात्यांचा विसर पडत चालला आहे. माणसं महत्त्वाची की मोबाइलसारखे साधन, महत्त्वाचा हा प्रश्न आज समाजापुढे आ वासून उभा राहिला आहे. मोबाइलच्या आहारी गेलेल्या पिढीला समुदेशन करण्याची गरज भासत चाललेली आहे.
राधा ही हुशार मुलगी घरात आणि शाळेतही. आई-वडील दोघे सुशिक्षित. वडील इंजिनीयर म्हणून कार्यरत आणि एक छोटासा भाऊ. असा राधाचा परिवार. हुशार असल्यामुळे राधाकडून साहजिकच सर्वांच्याच अपेक्षा वाढलेल्या होत्या. राधा दहावीपर्यंत अभ्यासात अतिशय हुशार अशी मुलगी. दहावीत चांगले टक्के मिळाले होते आणि सुशिक्षित आई-वडील. वडील चांगल्या हुद्द्यावर असल्यामुळे सगळ्या सुख-सुविधा त्यांच्या घरी होत्या. राधाचं कॉलेजला जाणं सुरू झाल्यापासून हातामध्ये चांगला हँडसेट तिला मिळाला. मित्र-मैत्रिणींचा घोळका वाढला आणि या सर्वांमध्ये ती गुंतून गेली. या सगळ्यांशी संपर्कात असताना तिच्याकडून जास्त प्रमाणात मोबाइलचा वापर होऊ लागला. तिचं हळूहळू अभ्यासावरील लक्ष कमी होऊ लागलं आणि मोबाइलमध्ये सतत ती गुंतलेली असायची. याकडे राधाच्या आईचं लक्ष गेलं आणि आई तिला सतत ओरडू लागली. जी आई तिला यापूर्वी कधीही ओरडत नव्हती. पण आपल्या मुलीचं अभ्यासावरील लक्ष उडत चाललेले आहे व ती मोबाइलमध्ये गुंतत चालली आहे. ही गोष्ट आईच्या नजरेतून सुटली नाही. वडील दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचे आणि आपल्या मुलीने काहीतरी बनावे, ही सर्वच आई-वडिलांच्या अपेक्षा असते. तशी राधाच्या आई-वडिलांची होती. तिने बारावीला सायन्स घेतल्यामुळे नीटच्या परीक्षेची तयारी चालू होती. बारावीला चांगले टक्के मिळाले तरी नीटमध्ये चांगले टक्के मिळाले, त्यावर तिचं भविष्य अवलंबून होतं. म्हणून आई तिला अभ्यासासाठी सतत मागे लागत होती. आईचं ओरडणं राधाला कुठेतरी खटकत होतं. आपल्यात व मोबाइलमध्ये आई कुठेतरी अडथळा निर्माण होते, असं राधाला सतत वाटू लागलं. अभ्यास कर, मोबाइलमध्ये लक्ष नको, हे बोलणं तिला टोचल्यासारखे होत होते.
परीक्षा जवळ आल्या तरी ती अभ्यास करत नाही, हे आईच्या लक्षात आल्यावर आईने एक दिवस तिला चांगल्या प्रकारे झापलं आणि तिच्यावर हात उगारला, त्यावेळी राधाचा राग अनावर झाला आणि तिने आपल्या आईला जोरदार धक्का दिला. तो धक्का एवढा जबरदस्त होता की, राधाची आई पलंगाच्या टोकावर पडली आणि पलंगाचा टोक डोक्याला लागून ती बेशुद्ध पडली. त्यावेळी घरामध्ये तिचा छोटा भाऊ नव्हता. तो खेळायला गेला होता आणि वडील तर कामावरच होते. राधाचा राग एवढा अनावर झालेला होता की, तिला कळालं होतं की, आपली आई बेशुद्ध झालेली आहे. तरीपण आईवर एवढा राग होता की तिने आपल्या आईचा दुपट्ट्याने गळा आवळला आणि तेही सर्व शांत डोक्याने करत होती. थोड्या वेळाने आपल्यावर कोणता आरोप येऊ नये, म्हणून तिने आपल्या वडिलांना मेसेज केला. मामाला मेसेज केला की, आई बेडरूमचा दरवाजा उघडत नाही. म्हणून तिचे वडील आणि मामा घरी आले व बघतात तर काय राधाची आई निपचित पडली होती. म्हणून लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आले डॉक्टर आल्यानंतर तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी पोलीस कम्प्लेंट झाली. पोलिसांना सुरुवातीला काहीच कळेना. पण पोलिसांचा संशय थोडा राधावर होता. कारण त्यावेळी फक्त राधाच घरी होती आणि राधाने वडिलांना व मामाला कळवलेलं होतं. दोन दिवसानंतर राधाला पोलिसांनी विश्वासात घेऊन सगळी हकीकत विचारली त्यावेळी झालेला सगळा प्रकार राधाने पोलिसांना सांगितला. तिच्या आईने तिच्यावर हात उगारला म्हणून तिला राग आला आणि तिने आईला धक्का मारला. त्यावेळी आईला पलंगाचं टोक लागला आणि ती बेशुद्ध होती. बेशुद्ध आहे माहीत असूनही रागाच्या भरात तिने आपल्या आईचा जीव घेतला. हुशार मुलगी, नीटच्या परीक्षेची तयारी करणारी मुलगी, भविष्यात काहीतरी बनणारी मुलगी आणि आपल्या या मुलीने काहीतरी बनावं, अशी अपेक्षा असलेले आई-वडील. आज मोबाइलच्या आहारी गेल्यामुळे ती स्वतःचं करिअर आणि स्वतःच्या आईला गमावून बसली.
राधा बालसुधारगृहात असून, तिची सजा पूर्ण करून बाहेर येईल. पण ती आईला पुन्हा आणू शकणार नाही. राधाचे वडील आपल्या बायकोला गमावून बसले. राधाचा भाऊ आपल्या आईला गमावून बसला. फक्त आई आपल्याला ‘अभ्यास कर’ म्हणून ओरडते, या शुल्लक गोष्टीमुळे या सर्वांची आयुष्ये बरबाद झाली.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)