रमेश तांबे
नीलचा आज गणिताचा पेपर होता. गणित नीलचा नावडता विषय. त्यामुळे सकाळपासूनच नील खूप उदास होता. आजचा पेपर कसा जाणार? याची चिंता त्याला सतावत होती. मनात सारखी धाकधूक सुरू होती. अकराचे टोले पडले अन् गणिताचा पेपर सुरू झाला. पेपर हातात पडताच नीलने त्यावरून भरभर नजर फिरवली अन् तो चांगलाच घामाघूम झाला. मग त्याने जमेल तसा पेपर लिहून काढला अन् केवळ अर्ध्या तासातच वर्गाबाहेर बाहेर पडला. नीलच्या सरांनादेखील आश्चर्यच वाटले.
एवढ्या लवकर घरी जाऊन उपयोग नाही. गेलो तर आई विचारत बसेल अन् बाबा चांगलेच बदडून काढतील, या भीतीने नीलचे पाय चौपाटीकडे वळाले. तो चौपाटीवरच्या वाळूत फिरला. नंतर तिथेच खेळत बसला. खेळता खेळता त्याला सापडली एक बाटली. ती जड होत चांगली. नीलने त्यावरची वाळू साफ केली. बाटली पाण्याने धुवून काढली. सूर्याच्या प्रकाशात ती चांदीसारखी चमकू लागली. बाटलीवर काही चित्रे कोरलेली होती. त्यावरून बाटली खूपच किमती वाटत होती. आता नील विचार करू लागला. काय करावे बरे? या बाटलीत काय असेल खरे! बाटली कधी उघडतो, असे त्याला झाले.
मग नीलने हळूच बाटलीचे बूच उघडले अन् काय आश्चर्य बाटलीतून आला पांढरा धूर. धुराबरोबर ऐकू आले संगीत सूर! बघता बघता धूर झाला मोठा आणि त्यातून एक राक्षस बाहेर आला. राक्षसाला बघून नील मात्र घाबरला. ततपप करीत थरथर कापू लागला. जीभ बाहेर काढून खदखदा हसून राक्षस नीलला म्हणाला, “ शाब्बास मुला, जीवदान दिलेस मला. काय काय हवंय सांग, जे जे आवडते तुला. मग नील भानावर आला आणि विचार करू लागला. काय बरे मागावे, काय त्याला सांगावे. राक्षस म्हणाला, “तीनच गोष्टी माग मग मी निघून जाईन! मुलगा म्हणाला तीन गोष्टी नाही दिल्यास तर?” राक्षस म्हणाला, “मग मी परत चूपचाप बाटलीत जाईन अन् शंभर वर्षे पुन्हा झोपून राहीन!”
नील विचार करू लागला. हा तर राक्षस खरा, नंतर सगळ्यांना देईन त्रास, याला बाटलीत बंद करायचाच खास! मग नीलने पहिली गोष्ट मागितली. माझ्यासाठी सुंदर सजलेला मोठा बंगला हवा. राक्षसाने एक डोळा बंद करून हवेत हात फिरवत “छू छा छू छे मंतर जंतर” असे म्हटले अन् काय आश्चर्य एका मिनिटात समुद्राच्या काठावर एक भलामोठा बंगला तयार झाला. नीलने तो आत जाऊन बघितला. त्याला तो खूपच आवडला. इकडे राक्षसाला झाली होती घाई. तो म्हणत होता, “नील पुढचा प्रश्न विचार भारी.” दुसऱ्या प्रश्नाला नीलने खूप विचार केला. तो राक्षसाला म्हणाला, “माझ्यासाठी नवी आणि सुंदर अशी शाळा एका बागेत बांधून दे!” मग पुन्हा राक्षसाने एक डोळा बंद करून हवेत हात फिरवत “छू छा छू छे मंतर जंतर” असे म्हटले अन् पुन्हा एकदा एकाच मिनिटात हिरव्यागार अशा मोठ्या बागेत भलीमोठी शाळा उभी राहिली. नवी शाळा बघून नील खूपच खूश झाला. त्याने आनंदाने जोरदार टाळ्या वाजवल्या. नील म्हणाला, “राक्षसा आता थोडा वेळ तू रहा बसून, मी माझी शाळा येतो बघून.” मग नील गेला शाळेत. शाळा बघता बघता तिसऱ्या प्रश्नाचा विचार करू लागला. त्याला शाळा खूपच आवडली. पण तिसरीही गोष्ट राक्षसाने दिली, तर खूपच गडबड होईल. मग साऱ्यांना तो त्रास देईल. तेव्हा सारेजण मलाच दोष देतील. या विचाराने नील अस्वस्थ झाला. कसेही करून राक्षसाला पुन्हा बाटलीत बंद करायचेच याच विचाराने तो परत फिरला. येता येता नीलला त्याच्या गणिताच्या पेपरची आठवण झाली अन् त्याचा चेहरा आनंदाने एकदम उजळला! नील राक्षसाला खुशीत म्हणाला, “हे बघ हा माझा गणिताचा पेपर सोडव तीन तासात आणि मगच जा आपल्या घरी नाहीतर बस शंभर वर्ष बाटलीत.”
राक्षस खदखदा हसत म्हणाला, अरे दे काहीही दोनच मिनिटांत सोडवून दाखवतो. मग नीलने त्याचा गणिताचा पेपर राक्षसाच्या हातात दिला. राक्षस हसत हसत म्हणाला एवढंच ना! लगेच राक्षसाने एक डोळा बंद करून हवेत हात फिरवत “छू छा छू छे मंतर जंतर” असे म्हटले. पण एकही गणित सुटले नाही. राक्षसाला वाटले आपण मंत्र बोलताना चुकलो असणार. मग राक्षसाने पुन्हा एक डोळा बंद करून हवेत हात फिरवत “छू छा छू छे मंतर जंतर” असे म्हटले. पण काहीच घडले नाही. अनेक वेळा मंत्र म्हणून राक्षस पार दमून गेला. पण एकही गणित सुटले नाही. आता त्याने त्याचा तो बिनकामाचा मंत्र बाजूला सारला अन् स्वतःच गणितं सोडवू लागला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, क्षेत्रफळ, परिमिती, लांबी आणि रुंदी… एकही शब्द त्याला कळेना. बिचारा राक्षस घामाघूम झाला. पेपर बंद करून झाडाला टेकून बसला.
नील म्हणाला, “राक्षसा सोडव लवकर पेपर शाळेत जायचंय मला. वाट बघतायत माझे मित्र. पाठ आहेत ना सारी सूत्रं!” राक्षसाने पुन्हा एकदा पेपरकडे बघितले अन् डोक्यावरचे केस उपटत म्हणाला, “नको रे बाबा ही असली गणितं. गणितं सोडवण्यापेक्षा मी आपला आनंदाने बाटलीतच राहातो. हा घे तुझा गणिताचा पेपर”, असं राक्षसाने म्हणताच मोठा धूर झाला अन् राक्षस बाटलीत शिरला. त्याचबरोबर नीलने बाटलीचे बूच झटकन लावून टाकले अन् ती चंदेरी सुंदर नक्षीची बाटली समुद्रात फेकून दिली. आपण लोकांना राक्षसापासून वाचवले, याचे नीलला खूप समाधान वाटत होते. दुसऱ्याच दिवशी गावाने नीलचा मोठा सत्कार केला. अनेकांनी फुलांचे हार त्याच्या गळ्यात घातले. सत्काराच्या वेळी हार घालताना नील एकसारखा मान खाली-वर करीत होता. लोकांचे अभिवादन स्विकारत होता.
तेवढ्यात सरांनी नीलच्या डोक्यात टपली मारली अन् म्हणाले “गधड्या गणिताचा पेपर सुरू आहे अन् झोपा काय काढतोस!” डोक्यात टपली बसताच नील भानावर आला. पहातो तर काय तो स्वतः परीक्षा हॉलमध्ये बसलाय. सारी मुलं भरभर पेपर लिहित आहेत. मग स्वप्न सारे आठवून नील गालात हसला, अन् पेपरमधली गणितं आता खुशीत बघू लागला!