अनघा निकम-मगदूम
आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे वेगळेपणामुळे कोकण जगाला अनोळखी नाहीय. त्यातही कोकण लक्षात राहतो, तो इथल्या चवदार हापूसमुळे! जगात ती चव तशी कुठेच सापडत नाही. पण आता आणखी एक नवी ओळख घेऊन कोकण पुन्हा जगासमोर येण्यास सज्ज झाले आहे, ती म्हणजे इथल्या खडकाळ जमिनीवर सापडलेली कातळशिल्प होय!
खूप वर्षांपूर्वीपासून दगडाच्या जमिनीवर अतिशय सुबकपणे कोणीतरी काही आकृत्या काढत गेले आहे, त्या कोणी काढल्या, का काढल्या हे आजपर्यंत तरी गूढ असले तरीही त्या गुढतेतसुद्धा कला आहे, एक वेगळा विचार आहे. या कोकणी माणसांच्या सांगण्यावर आता जग विश्वास ठेवायला तयार झालंय. कारण यातील काही कातळशिल्प ही युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या प्रस्तावीत यादीत दाखल झाली आहेत. युनेस्कोच्या या प्रस्तावित यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील ऊक्षी, जांभरूण, कशेळी, रुंढे तळी, देविहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे या ७ ठिकाणांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी, तर गोवा राज्यातील फणसामाळ अशी एकूण ९ ठिकाणांवरील कातळशिल्प रचनांचा यात समावेश आहे आणि कोकणवासीयांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
पण कोकणातील छोट्या-छोट्या गावातील कातळावर रेखाटलेल्या या रचनांचा युनेस्कोच्या प्रस्तावित यादीपर्यंतचा हा प्रवास तितका सोपा नव्हता किंवा या गूढ रचनांकडे रत्नागिरीतील काही हौशी निसर्गयात्रींचे लक्ष गेले नसते, तर या आकृत्या अशाच वर्षांनुवर्षे अपरिचित आणि गूढ बनून राहिल्या असत्या. कातळावर मूक पडून राहिल्या असत्या. या गूढ आकृत्यांबद्दल यापूर्वी थोडीफार चर्चा काही लोकांनी सुरू केली होती. मात्र त्याच्या शोधात, अभ्यासात सातत्य दाखवले ते रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेचे सदस्य सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी! रत्नागिरीत एका गावात कातळ जमिनीवर काहीतरी विचित्र चित्र काढल्याचे या मंडळींना दिसलं आणि कठीण दगडावर इतकं आखीव रेखीव कसं काय रेखाटलं गेलं इथपासून ते काय रेखाटलं गेलं, या उत्सुकतेपोटी या मंडळींनी स्वतः पदरमोड करत कोकणातील कातळशिल्प शोध, संरक्षण आणि संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. गावाबाहेरची उजाड माळराने भर उन्हात फिरत वेगळं काही नजरेने टिपत, कुणा बुजुर्गाला बोलतं करत, लोकांच्या मनातले गैरसमज दूर करत या तिघांनी ही शोधमोहीम गेले ६ ते ७ वर्षं अखंड सुरू ठेवली. सतत चर्चा, त्यातून जनजागृती, मिळणाऱ्या आकृत्यांमध्ये दडलेला अर्थ लावण्याचा प्रयत्न करत या मंडळींनी या मोहिमेतून त्यांनी आजतागायत ७२पेक्षा अधिक गावसड्यांवरून १७००पेक्षा अधिक कातळशिल्प रचना शोधून जगासमोर आणल्या आहेत. त्यावर विविध विषय तज्ज्ञांच्या मदतीने सविस्तर संशोधनाचे कामदेखील चालू केले आहे. मात्र शोधकार्य आणि संशोधनापुरते मर्यादित नसून त्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी देखील सर्व पातळीवर निसर्गयात्री संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रयत्न करत आहेत. कधी चर्चासत्र, कधी गाव भेट, कधी लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत जाऊन, तर अगदी मार्च महिन्यात झालेल्या महोत्सवाच्या माध्यमातून या शोधकर्त्यांनी या चित्रांना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रयत्नांना डॉ. तेजस गर्गे, संचालक पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे ऋत्विज आपटे यांची तोलामोलाची साथ लाभली आहे.
जागतिक स्तरावरील या कातळशिल्पांचे महत्त्व ओळखून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी कातळशिल्प युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणेसाठीचा पुरातत्व विभागाकडून डॉ. तेजस गर्गे यांनी मांडलेला प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. भारतातील सांस्कृतिक आणि प्राचीन गोष्टींबाबत कायमच सजग असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने याचे महत्त्व जाणत सदर प्रस्तावास मंजुरी देत प्रस्ताव युनेस्को जागतिक वारसा केंद्राच्या कमिटीकडे पुढील मंजुरीस पाठवला.
या सर्व प्रयत्नांना युनेस्को कमिटीने कोकणातील कातळशिल्प ठिकाणांना प्रस्तावित यादीत समावेश करत जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. अर्थात प्रस्तावित यादीत समावेश म्हणजे मान्यता नक्कीच नाही; परंतु पुढील बाबींच्या पूर्तेतेसाठी अजून खूप काम करायला लागणार असून जिद्दी मंडळींकडून ते नक्की पूर्ण होणार आहे, असा विश्वास यानिमित्ताने वाटतो.
कोकणातील कातळशिल्प ठिकाणांना युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा दिल्यास संबंधित परिसराला जागतिक स्तरावर मान्यता मिळेल. या मान्यतेमुळे विविध माध्यमांतून खूप मोठा फायदा होऊ शकतो. रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध होतील. कोकणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी, पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मित व्हावी, यासाठी हाती घेतलेल्या कार्याला आज जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे, ही खूप मोठी संधी आहे. यामध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी केलेले काम मुद्दाम उल्लेखनीय आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील निर्जन जमिनीवर पडून राहिलेल्या या चित्रांना वेगळी ओळख मिळत आहे आणि पूर्वी मानव एकत्र होते असे म्हटले, तर कदाचित ही चित्रे जगभरात पोहोचल्यानंतर त्याचा अर्थसुद्धा उलगडू शकेल. पण यासाठी आता या चित्रांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळणे, इतकी एकच गोष्ट राहिली आहे.