नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असतानाच आता चौथ्या लाटेचे संकट घोंगावताना दिसत आहे. देशातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कोविड अजून गेलेला नाही, असे नमूद करत सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती आधीपासूनच व्यक्त करण्यात आली आहे. त्यात अनेक शहरांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. हरयाणातील गुरुग्राममधील स्थिती चिंता वाढवणारी आहे. तेथील कोविड पॉझिटिव्हिटी रेट वाढून आता ८.५ टक्के इतका झाला आहे. हरयाणात बुधवारी एकूण १७९ नवीन बाधितांची नोद झाली होती. त्यापैकी १४६ रुग्ण एकट्या गुरुग्राम येथील होते. त्याशिवाय दिल्लीतील अनेक भागांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दिल्लीत गुरुवारी ३२५ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. दिल्लीतील कोविड पॉझिटिव्हिटी रेट सध्या २.३९ टक्के आहे. दिल्लीतील काही शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. शाळेत एक जरी रुग्ण आढळला तरी शाळाच बंद करण्यात यावी वा संबंधित विंग बंद ठेवली जावी, असे निर्देश दिले गेले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा येथे चार शाळांमध्ये कोरोनाचे १९ रुग्ण आढळले असून खबरदारी म्हणून शाळा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मुंबईतही दैनंदिन रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. बुधवारी मुंबईत ७३ नवीन रुग्णांची भर पडली होती.