नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या काळात सुरु होत असलेले हे संग्रहालय देशाला लाभलेल्या सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भारताची कथा सांगेल.
राष्ट्र उभारणीमध्ये आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासंदर्भातील पंतप्रधान मोदी यांच्या मनातील कल्पनेला अनुसरून या संग्रहालयाची संकल्पना आखण्यात आली असून हे पंतप्रधान संग्रहालय म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांना त्यांची विचारसरणी आणि कार्यकाळ यांना गृहीत ना धरता वाहिलेली आदरांजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेला हा समावेशक प्रयत्न असून आपल्या सर्व पंतप्रधानांचे नेतृत्व, द्रष्टेपणा आणि त्यांनी केलेली सफल कामगिरी याबद्दल नव्या पिढीला जागृत करून त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे.जुन्या आणि नव्या गोष्टींचा सुंदर मिलाफ दर्शवत, या संग्रहालयात पूर्वीचे तीन मूर्ती भवन ब्लॉक १ म्हणून तर नव्याने बांधलेली इमारत ब्लॉक २ म्हणून दाखविण्यात आली आहे. या दोन्ही ब्लॉक्सचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौरस मीटरहून अधिक आहे.
या संग्रहालयाच्या इमारतीची रचना उदयोन्मुख भारताच्या तसेच स्वहस्ते त्याला आकार देणाऱ्या आणि घडविणाऱ्या नेत्यांच्या कहाणीतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. या इमारतीच्या संरचनेत शाश्वत आणि उर्जा संवर्धन प्रक्रिया अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या कामादरम्यान एकही वृक्ष तोडण्यात आला नाही किंवा त्याचे प्रत्यारोपण करावे लागले नाही. संग्रहालयाचे बोधचिन्ह म्हणजे देश आणि लोकशाही यांचे प्रतीक असलेले धर्मचक्र पेलणाऱ्या भारतीय जनतेच्या हातांचे प्रतीक आहे. या संग्रहालयासाठी आवश्यक असणारी माहिती प्रसार भारती, दूरदर्शन, चित्रपट विभाग, सांसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, भारतीय तसेच परदेशी माध्यम संस्था, परदेशी वृत्त संस्था इत्यादींकडे असणारे माहितीचे भांडार आणि विविध स्रोत यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे.
गरिबांच्या कल्याणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : मोदी
गरिबांचे कल्याण यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीच्या काळातही आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेने आपल्या नागरिकांना आश्वस्त केले आहे, की सरकार प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे ते पुढे म्हणाले.