ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली, असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे विकास पर्यटन होऊ शकतो, अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. हिरवीकंच वनराई व सुंदर समुद्रकिनाऱ्याचे वरदान कोकणला लाभले आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या सृष्टीसौंदर्यामध्ये जगाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे. जगातील अनेक पर्यटनस्थळे जाणीवपूर्वक विकसित केलेली आहेत. कोकणला मात्र निसर्गानेच सौंदर्य बहाल केले आहे. हे सौंदर्य कोकणी माणसाला सुखाने जगण्याचे साधन होऊ शकते, त्यांच्या आर्थिक उन्नतीचा भाग होऊ शकते.केवळ पर्यटन व्यवसायावर जगातील अनेक छोटे-छोटे देश विकसित झालेले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सगळे जग फिरलेल्या नारायण राणे यांनी कोकणचे हे सामर्थ्य ओळखले. निसर्गाने दिलेल्या या वरदानाचा उपयोग कोकणी माणसाच्या विकासाचा आधार होऊ शकतो, म्हणून या भागातील पर्यटनस्थळे विकसित करण्यावर भर दिला.
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समुद्र जगाला पाहता यावेत, जिल्ह्यामध्ये देशी-विदेशी पर्यटक यावेत आणि त्यांच्या माध्यमातून पर्यटन विकास व्हावा यासाठी चिपी सारखे विमानतळ व्हावे ही त्यांची इच्छा.
राणेसाहेबांनी देवबाग, तळाशील या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन हे किनारे जगाच्या पर्यटन नकाशावर नेले. आज ही स्थळे पर्यटनाची हॉटस्पॉट म्हणून ओळखली जातात.
मासेमारी आणि भातशेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या या भागात आता गेल्या ८-१० वर्षांत पर्यटन व्यवसाय जम बसवू लागला आहे. गोव्याला पर्याय म्हणून आता विदेशी पर्यटक तसेच देशी पर्यटक आता मालवण, तारकर्ली आणि देवबाग वेंगुर्ला या भागाला पसंती देऊ लागले आहेत. गोव्याच्या तुलनेत खूपच कमी खर्चात आणि गर्दीपासून लांब निवांत सुट्टी घालवण्याचे ठिकाण म्हणून या भागांकडे पर्यटकांचा ओढा आहे. सागरी साहसी खेळ, डॉल्फिन दर्शन, सुंदर समुद्र किनारे, समुद्रस्नान, निवांतपणा आणि मालवणी फिश थाळी यासाठी पर्यटक येथे येत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला या तालुक्यांना अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. यांपैकी मालवण हा समुद्री पर्यटनाचे माहेरघर म्हणून ओळख असलेला तालुका आहे. मालवणमधील देवबाग, तारकर्ली आणि मालवण किल्ला या ठिकाणांना पर्यटक मोठी पसंती देतात.
सुमारे दहा लाख पर्यटक जलक्रीडेतील विविध प्रकारांचा अनुभव घेतात. त्यापैकी मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याला वर्षाकाठी चार लाखांच्या आसपास पर्यटक भेट देतात. तिन्ही तालुक्यात जलक्रीडा व्यवसायात २२ गट कार्यरत आहेत, तर स्कूबा व्यवसायात २९ गट कार्यरत आहेत.
यामुळे येथील नागरिक जलक्रीडा पर्यटन व्यवसायाकडे वळले. त्सुनामी आयलंडच्या वाळूमध्ये येथील नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपाची उपाहारगृहे सुरू केली आहेत. तसेच पर्यटकांना बसण्यासाठी माडाच्या लाकडापासून कोकणी पद्धतीतील मच्छानी उभारल्या आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बोटिंगही करता येते. तसेच वॉटर स्पोर्ट्समध्ये जेट स्की राइड, बंपर राइड, बनाना राइड आदी पाण्यातील क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्पीड बोटही पर्यटकांच्या दिमतीला ठेवण्यात आली आहे. आज ही सर्व स्थळे पर्यटन हॉटस्पॉट ठरली आहेत. मुळात भडक डोक्याच्या असलेल्या इथल्या स्थानिक माणसाला “अतिथी देवो भव”चे महत्त्व पटले आहे आणि याचे सारे श्रेय राणेसाहेबांनाच द्यायला हवे.
पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक प्रकल्प या विभागात प्रस्तावित आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘सी वर्ल्ड.’ हा एकटा प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर हजारो कुटुंबांच्या जगण्याचे ते साधन होऊ शकते. त्याशिवाय या प्रकल्पाच्या निमित्ताने हॉटेल्स, उपाहारगृहे, गाइड अशा पूरक उद्योगांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळू शकतो. असे अनेक प्रकल्प त्यांनी या विभागात आणलेले आहेत.
तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता मिळेल तो उद्योग उभा केला पाहिजे. त्यातून आपल्या संसाराला आर्थिक स्थैर्य दिले पाहिजे, ही भूमिका ते वारंवार मांडत असतात. गतवर्षी त्यांच्या उपस्थितीत सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी सल्ला अत्यंत मोलाचा आहे. केवळ बाहेरचे लोक महाराष्ट्रात येतात, आमचे रोजगार हिरावून घेतात अशी ओरड करून चालणार नाही. इतर राज्यांतून आलेले लोक ज्या तऱ्हेने मेहनत करतात, कष्ट करतात. तसे कष्ट आपणही केले पाहिजेत. कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. कुठेही ताठरपणा न दाखवता व्यापाऱ्यांकडे जो लवचिकपणा लागतो तो अंगी बाळगा. उद्योग करा. पर्यटन आणि उद्योगातून स्वत:च्या विकासाबरोबरच राज्याचा विकास साधा, असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या या विचारांतून दहा उद्योजक तयार झाले तरी बोलण्याचे सार्थक होईल, असे नारायण राणे तळमळीने सांगतात. भावनिक मुद्यांच्या मागे लागून स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा तरुणांनी उद्योगाकडे वळावे. तेच त्यांच्यासह देशाच्या हिताचे आहे. पण अशा राणेसाहेबांसारख्या लोकनेत्यांचा योग्य उपयोग कोकणी माणूस करून घेऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे.
– जितेंद्र पंडित सिधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक महासंघ, अध्यक्ष – सावंतवाडी