अनुराधा परब
तिरफळं प्रमाणात घातलेलं पेडव्याचं किंवा बांगड्याचं तिखलं आवडणाऱ्या अस्सल मत्स्यप्रेमींना नारळाऐवजी तिरफळाचं झाडच कल्पवृक्ष वाटतं. मुळातच चविष्ट असणाऱ्या माशांना कोकणातल्या खास मसाल्यांची जोड ही अधिक रूचकर करते. माशाची आमटी आणि भात हेच मुख्य अन्न असलेल्या कोकणाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही तिथल्या मत्स्यवैविध्याशी निगडित आहे. १२१ किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेल्या सिंधुदुर्गाच्या समुद्रामध्ये आढळणाऱ्या माशांची गुणवत्ता, चव अन्यत्र कुठेच सापडणार नाही, इतकी ती एकमेवाद्वितीय आहे. सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने तसेच त्यावर आधारित आर्थिक उत्पादनासाठी देशातील सर्वोत्तम किनारपट्टी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे.
सिंधुदुर्गातील कमी लांबीच्या तेरेखोल, तिल्लारी, गडनदी, कर्ली, देवगड, वाघोटन या नद्या आणि विजयदुर्ग, देवगड, आचरा, सर्जेकोट, तारकर्ली, मोचेमाड, तेरेखोल इत्यादी खाड्या सागरी परिसंस्था समृद्ध ठेवण्यासाठी हातभार लावत आहेत. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर राहणारा मच्छीमार समाज हा मासेमारी आणि त्याच्याशी संबंधित पूरक उद्योगांवर आपली उपजीविका करताना दिसतो. पारंपरिक तर कधी रापण (सामूहिक) पद्धतीने मासेमारी करणाऱ्या या मच्छीमारांच्या जाळ्यात सुरमई, कोळंबी, पापलेट, हलवा, बांगडा, चोणक, मोड्सो, बोंबिल, रावस, माकुल, मांदेली, घोळ, मोरी, तांबोशी, रेणवे, कर्ली, शीणाने असे वेगवेगळे मासे अडकतात. या चविष्ट माशांच्या खरेदीसाठी मालवणच्या बाजारामध्ये मत्स्यप्रेमींची झुंबड उडते.
गुजरातपासून ते केरळपर्यंतच्या समुद्रामध्ये डॉल्फिन्स, व्हेल, देवमासा यांचा संचार आहे. यातील डॉल्फिन्स माशांचा अधिक आढळ हा सिंधुदुर्गातील समुद्रामध्ये किनाऱ्याजवळ दिसून येतो. सागरी पर्यावरणाला अनुकूल अशी डॉल्फिन्सची जीवनशैली असून अन्य भूचर प्राण्यांपेक्षा त्यांची शरीररचना वेगळी असल्याने कायमच यांचे जगणे पाण्याशीच संबंधित राहते. दात असलेले (सदंत) आणि दात नसलेले असे दोन उपप्रकार या जलचरांमध्ये असतात. सदंत डॉल्फिन्सचे तब्बल ७१ प्रकार असून त्यातील काही नदीमध्ये, तर बाकीचे समुद्रामध्ये आढळून येतात. सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याजवळ बहुतांश वेळा सदंत पॅसिफिक हम्पबॅक डॉल्फिन आढळून येतात. अतिशय बुद्धिमान, लांब चोच आणि शंखाकृती दात असलेले हे मासे नदीमुखाजवळ किंवा समुद्राच्या उथळ पाण्यातील खाड्यांमध्ये राहणे पसंत करतात. बांगडा किंवा त्यासारख्या लहान माशांच्या थव्यांवर ताव मारणारे हे डॉल्फिन्स मच्छीमारांसाठी मात्र डोकेदुखी ठरतात. मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात कधी ते अडकतात, तर कधी या जाळ्यात सापडलेल्या माशांवरच ते डल्ला मारून जाळ्याचं पर्यायाने मच्छीमारांचेही नुकसान करतात. डॉल्फिन्सबरोबरच या भागात ब्रूडीज् वेल्स आणि ब्लू व्हेल्स या दोन देवमाशांच्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळतात. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोकण सिटेशियन्स रिसर्च टीम सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या डॉल्फिन्स, व्हेल्स, पोर्पोईजवर अधिक संशोधन करते आहे.
मालवण किनारपट्टीवरील सागरी पर्यावरणाची गुणवत्ता ही सर्वोत्तम प्रकारची असल्यामुळे इथे कोरल आणि समुद्रफुले सापडतात. लॉबस्टर्स, कोळंबी, बांगडे, खेकडे ही नैसर्गिक मत्स्यसंपत्तीदेखील मुबलक आहे. चविष्ट बांगड्याने तर शेक्सपिअरपासून ते पिकासो, व्हॅन गॉगपर्यंत सगळ्यांवरच जादू केली आहे. इतकंच कशाला जपानी संस्कृतीमध्येही बांगड्याचे महत्त्व एवढे आहे की, २०१८ ‘जपान्स डिश ऑफ २०१८’चा किताब त्याला मिळाला आहे. उत्तम प्रकारच्या चवीची खात्री असलेल्या या आणि अशा माशांसाठी गोवा, कर्नाटक, गुजरातपासूनचे मच्छीमार इथे मासेमारीकरिता येत असतात. मागणी वाढती असली तरीही मासळीच्या प्रजननाला नैसर्गिकरीत्या मर्यादा पडतात, हे विसरून चालणार नाही. या साखळी परिसंस्थेवर गेल्या वर्षभरात आलेल्या विविध चक्रीवादळांचा जसा परिणाम झाला आहे तसाच धोका मानवनिर्मित कारणांनीही झाला आहे. मत्स्योत्पादनावर याचे दुष्परिणाम होतानाही दिसत आहेत.
सिंधुदुर्गाच्या रत्नाकराच्या उदरातील समुद्री कासवे हादेखील मौल्यवान जैविक ठेवा आता संवर्धनाच्या कक्षेत आला आहे. सागरी कासवांच्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लाँगर हेड, हॉक्सबिल या चार प्रजातींपैकी सिंधुदुर्गात ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल आणि हॉक्सबिल ही कासवे आढळतात. मोचेमाड, सागरतीर्थ, वायंगणी, मुणगे, शिरोडा इत्यादी ठिकाणी विणीच्या हंगामात सागरी कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. या कासवांच्या अंड्यांना माणूस, कुत्रा आणि अन्य जनावरांपासून तसेच समुद्रामध्ये कासवे शार्कचे भक्ष्य ठरल्यामुळेही या प्रजाती दुर्मीळ होण्याचा धोका वाढत होता. कासव हा सागरी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा दुवा असून त्यांच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांपासून भाऊ काटदरे आणि त्यांच्या मित्र-मंडळींनी विशेषत्वाने प्रयत्न सुरू केले आहेत. देवबाग, तारकर्ली येथे संरक्षित केलेल्या पहिल्या ग्रीन सी टर्टलची ७४ पिल्ले यंदाच्या मार्च महिन्यामध्ये समुद्रामध्ये सोडण्यात आली.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा कासवांच्या प्रजननाचे, संवर्धनाचे प्रमुख केंद्र ठरले आहे. वायंगणीच्या कासव जत्रोत्सवाच्या माध्यमातून कासवांच्या संवर्धनाची पर्यायाने सागरी जैवविविधतेच्या जतनाची आवश्यकता अधोरेखित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम निसर्गप्रेमी मंडळींनी सुरू केलेला आहे. कांदळवन कक्ष, मँग्रोव्हज फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत यंदाच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन कासवांच्या पाठीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून त्यांच्या सागरी अधिवास तसेच स्थलांतराच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे.
कुबेराचे धन आणि समुद्रातील संपत्ती ही अक्षय्य असते, असे म्हणतात. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यायलेली खास इथल्या प्रांतातली मासळी अस्सल खवय्यांना भुरळ घालते. विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार आहे तो माशाचाच. बायबलमधल्या गोष्टीनुसार सृष्टी घडविणाऱ्या देवांनी सूर्य, चंद्र, ताऱ्यांनंतर तयार केला तो मासाच. खाण्यापासून गाण्या-साहित्यापर्यंत कोकणभूमीतल्या जीवनसंस्कृतीत मत्स्यसंस्कार असा घट्ट रुजलेला दिसतो.
(ज्येष्ठ पत्रकार,प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक)