मृणालिनी कुलकर्णी
चैत्रशुद्ध नवमी, हिंदूंच्या चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस. या दिवशी भगवान विष्णूचा ७वा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीरामाचा जन्म झाला, तो आजचा दिवस रामनवमी. भाविक अत्यंत उत्साहात, आनंदात रामनवमी साजरी करतात. वाल्मिकी रामायण हा भारतीय वाङ्मयातील हिंदू धर्मातील सर्वोकृष्ट ग्रंथ आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून प्रतिभासंपन्न वाल्मीकीने अलौकिक सामर्थ्याचा व उदात्त नीतिमत्तेच्या, पराक्रमी पुरुषाचे चरित्र लिहून जगापुढे ‘रामायण’ सादर केले. आदर्श जीवन जगण्याची शिकवण देणाऱ्या रामकथेचा मूळ रस करुण आहे.
नात्याने पिता-पुत्र असूनही एकमेकांना ओळखतही नसलेले लव-कुश अयोध्येत श्रीरामासमोर रामचरित्र गाताना, वाल्मीकी म्हणतात, “भगवान श्रीराम बिंब आहेत, तर ही बालके प्रतिबिंब आहेत.” नकळत ग. दि. मा. आणि बाबूजींचे ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती… कुश-लव……’ हे काव्यस्वर ओठावर येतात. त्यांच्या गीतरामायणांनी महाराष्ट्रात घराघरांत इतिहास घडविला. रामायणकथा माहीत असूनही वाचली जाते, कारण रामायण हा एक आदर्शवाद आहे.
स्वामी गोविंददेव गिरी यांच्या ‘श्रीराम-कथामृत’ या पुस्तकातील काही माहिती शेअर करते. कौसल्यानंदनाचे नामकरण करताना महर्षी वसिष्ठाच्या मुखातून ‘राम’ हे नाव बाहेर पडले. या रामनामाचे महात्म्य असे, अवघ्या जगाला जो संपूर्ण आनंद देतो तो आनंदसिंधू म्हणजे श्रीराम. रघुवंशीय श्रीराम हे आजन्म शुद्ध, सत्यनिष्ठ आणि निरंतर कर्मयोगी होते. रामनामाचा जप कुणीही केव्हाही, कुठेही आणि कसाही करावा. सगळ्या पातकांना जाळून टाकणारे हे दिव्यनाम आहे. जीवनात रामाची आराधना करताना सगळे जग दूर गेले तरी राम आपल्यासोबत राहील. याचे उदा. समर्थ रामदास. समर्थांनी स्वतःच्या लग्नात ‘सावधान’ शब्द ऐकल्यावर, सावधानचा अर्थ कळल्यावर समर्थ जे धावले ते थेट नाशिकच्या काळाराम मंदिरात, ‘देवा आलो तुझ्या चरणी; सुटलो.’ समर्थांच्या जीवनातले शेवटचे वाक्य ‘रघुनाथाशिवाय मला कोणी नाही.’ ज्यांना माणूस म्हणून जगायचे आहे, त्यांकरिता ही रामकथा आहे.
रामचंद्र देव होते की मानव? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो? रामकथेत रामाचे मानवी रूप दिसते. श्रीराम हा केवळ सूर्यवंशी दशरथपुत्र नाही, तर भावी अयोध्येचा राजा आहे. या दूरदृष्टिकोनातून विश्वामित्रांनी तरुणपणीच रामाला राजमहालातून बाहेर काढून प्रजेतील लोकांशी संवाद घडवून आणला. अयोध्या ते मिथिला या प्रवासात पूर्वजांच्या गोष्टी सांगत त्यांच्यात धैर्यवाद जागा केला. विश्वामित्रांच्या या संस्कारामुळे वनवासी जीवनात, रामचंद्रानी कुणालाही कमी न लेखता, सर्वांना समजून, सामावून घेता आले. भगवान श्रीरामचंद्र आधीपासून मनुष्यरूपातच वावरत होते. त्याच्यामधील सद्गुणामुळे त्यांच्या मनुष्य असण्याविषयी संशय निर्माण झाला. त्यांनी धर्माचा कधी त्याग केला नाही ते धर्मज्ञ, कृतज्ञ आणि सत्यनिष्ठ होते. जेव्हा रावण मारला गेला तेव्हा साक्षात देवांनी आपण ‘देवाधिदेव आहात’ असे म्हणताच रामचंद्र म्हणाले, महाराज! मी दशरथपुत्र आहे.
मी माणूस आहे, मला देव बनवू नका.
रामायणात, रामसेवेत खंड पडू द्यायचा नाही, यासाठी अविरत कष्ट भोगले, संसार सुखाचाही त्याग केला, ती लक्ष्मणाची सगुण भक्ती. दुसरीकडे, रामराज्य पदाचा त्याग करून, सिंहासनावर श्रीरामाच्या पादुका ठेवून वनवासी जीवन पत्करले. सोबत राम नसताना मनोमन केलेली सेवा, ही भरताची निर्गुण भक्ती.
रामचंद्रांचा आदर्शवाद –
१. रामचंद्रांच्या रामराज्यात प्रजा सुखी होती. रामचंद्रांचे शब्द, “आराधनाय लोकाना:” लोकांची आराधना करण्यासाठी मी सिंहासनावर बसलो आहे. माझ्या जीवनात प्रजेपुढे सर्वांना दुय्यम महत्त्व आहे.
२. प्रजेसाठी पत्नी सीतेचा त्याग केला. यज्ञाकरिता पत्नीची आवश्यकता असते. त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले, “राजकर्तव्य म्हणून राजाने राणीला दूर केले पण रामाने सीतेला दूर केले नाही. माझ्या जीवनात तिची जागा दुसरे कुणीही घेऊ शकत नाही.” (नलकुबेरांच्या पत्नीने, ब्रह्मदेवाकडून मिळविलेल्या शापामुळे, रावण सीतेला नव्हे कोणत्याही परस्त्रीला स्पर्श करू शकत नव्हता)
३. रामाला कुणाचाही द्वेष नाही. रावणाला ठार मारले, पण देहाची विटंबना होऊ दिली नाही. मनुष्य संपला, वैर संपले.
४. श्रीरामचंद्रांनी राज्याच्या पैशाचा उपयोग कधीही स्वतःसाठी न करता राज्यासाठी, पतितांच्या उद्धारासाठी केला. वेदातील मंत्रानुसार ‘शंभर हातांनी गोळा करावे आणि हजार हातांनी द्यावे.’
५. सहकाऱ्यांमध्ये मतभेद होते. बिभीषण, लक्ष्मण दोघांच्या मताप्रमाणे वागून, वानरसेनेच्या सहकार्याने, श्रीरामाने सागरी सेतू बांधला.
६. चौदा वर्षे वनवासासाठी श्रीरामाने साऱ्याचा त्याग केला; परंतु आपले धनुष्य सोबत ठेवले. श्रीरामाचे कोदंडमागचे तत्त्वज्ञान असे की, केवळ सज्जनतेने जगाचे प्रश्न सुटत नाहीत. कर्तव्याचे पालन हे तप, तसेच युद्ध करणे हे क्षत्रियांचे तपच आहे!
७. ८७ दिवस चाललेल्या युद्धात, तटस्थ इंद्राला, रामाच्या विजयाची खात्री पटताच सुमारे ८० दिवसांनंतर रथ पाठविला म्हणून रथ घ्यायला नकार देताच रामचंद्र म्हणतात, “लक्ष्मणा देवाचा अपमान करणे बरोबर नाही. मी या रथाचा स्वीकार करतो.”
८. युद्ध समाप्तीनंतर बिभीषण रामचंद्रांना विनंती करतात, “प्रभो! अयोध्या सोडून १४ वर्षे झाली लंकेचे राज्य आता आपलेच आहे. तुम्ही जाऊ नका. साश्रूने रामचंद्र म्हणतात, मला स्वर्गाच्या साम्राज्याचा मोह नाही. मला माझी अयोध्या मातृभूमी प्रिय आहे.
९. रामकथेच्या शेवटी राज्याच्या हिताकरिता, अयोध्या वाचावी म्हणून केलेल्या छोट्याशा चुकीबद्दल लक्ष्मणाला प्राणदंडाची शिक्षा देण्यात आली. प्रभूला प्रणाम करून लक्ष्मणाने शरयू नदीत प्रवेश करून देहत्याग केला. त्यापुढे भगवान श्रीराम सिंहासनावरून उतरले, त्यांनी महर्षी वसिष्ठांना प्रणाम केला नि सांगितले, “सिंहासन आता तुम्ही सांभाळा, राजा म्हणून मी न्याय केला. पण माझ्याशिवाय लक्ष्मण आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.” आता भाऊ म्हणून लक्ष्मणापाठोपाठ प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीत प्रवेश केला. इथे रामकथा संपते.
भगवान श्रीरामचंद्राचे जीवन, त्यांचा आदर्शवाद आपल्याला कधी मोजता येणार नाही, इतका उच्च आहे. त्यासाठी तेवढी आपली बुद्धी शुद्ध असावी लागेल.
॥जय श्रीराम॥
[email protected]