Saturday, July 20, 2024
Homeराजकीयराणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख...

राणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख…

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं दैवत. त्यांच्या परिसस्पर्शाने आमच्यासारख्यांचं सोनं झालं. राजकारणापलीकडे सर्वसामान्य जनतेला सुखी-समाधानी राखण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी नेहमीच आग्रह धरला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच एक सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख ते सावंतवाडी नगरीचा नगराध्यक्ष अशी मजल मी मारू शकलो.

  • सच्चिदानंद ऊर्फ संजू परब, माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते, सिंधुदुर्ग

एक कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली याहीपुढे जनतेची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तत्पर असेन.

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं दैवत. त्यांच्या परिसस्पर्शाने आमच्यासारख्यांचं सोनं झालं. राजकारणापलीकडे सर्वसामान्य जनतेला सुखी-समाधानी राखण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी नेहमीच आग्रह धरला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच एक सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख ते सावंतवाडी नगरीचा नगराध्यक्ष अशी मजल मी मारू शकलो. मात्र याहीपेक्षा राणे कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांचे जे प्रेम मिळाले ती माझ्या जीवनातील खरी कमाई आहे. “संजू परब हा आमच्या कुटुंबातील एक आहे,” या शब्दांत जेव्हा साहेबांनी माझा उल्लेख केला त्यावेळी मी खऱ्या अर्थाने भरून पावलो. त्यामुळेच एक कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली याहीपुढे जनतेची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तत्पर असेन.

मडुरा गावात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या संपर्कात आलो. तत्कालीन शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून मी काम करत होतो. याच दरम्यान शिवसेनेतून राणेसाहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच मीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या नेतृत्वाचा खरा परिसस्पर्श झाला तो २००९ च्या लोकसभा निवडणुकीत. या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राणे साहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेशजी राणे यांच्या मी संपर्कात आलो. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर या निवडणुकीत निलेशजींना विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवण्यात आम्ही खारीचा वाटा उचलला. त्यानंतर निलेशजींचा लाडका कार्यकर्ता म्हणून मला ओळखले जाऊ लागले. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा सरचिटणीस, अध्यक्ष अशी पदेदेखील त्यावेळी मला प्राप्त झाली. त्यानंतर २०१४ साली सावंतवाडी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी ना. राणे यांनी माझ्यावर सोपवली.

साहेबांच्या या विश्वासानंतर मी झपाटल्यागत पूर्ण तालुका पिंजून काढला व गावोगावी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र करण्यास सुरुवात केली व त्यांच्यात आगामी कुठल्याही निवडणुकीत आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी बळ दिले. याची सुरुवात झाली ती सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीने. यापूर्वी १७-० असे मागे असलेल्या सावंतवाडी नगर परिषदमध्ये आपली काही डाळच शिजणार नाही, असा सर्वांचा समज होता. मात्र नारायणराव राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सावंतवाडी नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ८ नगरसेवक निवडून आणले व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडीतील साम्राज्याला सुरुंग लावला. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ५, तर पंचायत समितीच्या १८ पैकी ११ जागा काँग्रेसच्या निवडून आणल्या. तसेच त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८०% ग्रामपंचायती निवडून राणेसाहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. ज्यावेळी राणेसाहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला, त्यावेळी देखील काही ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील ८० टक्के ग्रामपंचायती निवडून आणत आम्ही दादांना अनोखी भेट दिली, फरक एवढा होता की यावेळी पक्ष पूर्णपणे नवखा होता.

त्यानंतर २०१९मध्ये राणे साहेबांबरोबरच मी भाजपमध्ये प्रवेश केला. नारायणराव राणेसाहेब व माजी खासदार निलेशजी राणे यांच्यावर माझी मनोमन श्रद्धा व पूर्णपणे विश्वास होता. या विश्वासातूनच मला आलेली विरोधकांची अनेक आमिषे धुडकावून लावली व साहेबांशी प्रामाणिक राहिलो. भाजप पक्षात आल्यानंतरही मी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत माझ्यावर पडलेली जबाबदारी अगदी विश्वासाने पार पाडली. याच विश्वासातून साहेबांनी एक मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. याच काळात जाहीर झालेल्या सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत मला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून साहेबांनी उमेदवारी दिली. याही वेळा साहेबांच्या आशीर्वादाने व भाजपचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण, निलेशजी राणे व आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या मेहनतीने ही निवडणूक जिंकून मी नगराध्यक्षपदी निवडून आलो.

मात्र यानंतर खरी जबाबदारी होती. भाजपचा सावंतवाडीचा पहिला नगराध्यक्ष म्हणून मला सन्मान मिळाला होता. त्यामुळे साहेबांना अपेक्षित काम करायचे होते. यातच अचानक उद्भवलेल्या कोरोना साथीत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी दिवस-रात्र काम केले. बरीच वर्षे खोळंबलेली अनेक विकासकामे व बंद प्रकल्प मार्गी लावले. कालावधी फारच कमी होता. मात्र जबाबदारीही तेवढीच होती. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कठीणप्राय जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यावेळी शहरासोबत बांदा शहर व अन्य ग्रामीण भागातही भाजप पक्षाच्या संघटनवाढीसाठी काम करत राहिलो. नगर परिषदेत अनेक धाडसी निर्णय घेतले. विकासाच्या अनेक योजना मार्गी लावल्या.

याच दरम्यान, एके दिवशी अचानकपणे राणेसाहेब सावंतवाडी नगर परिषदेला भेट देणार असा फोन आला. साहेब पहिल्यांदाच सावंतवाडी नगर परिषदेत येणार होते. सायंकाळी ६ वाजता साहेब आले. त्यांनी आमच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले. माझ्या व सहकाऱ्यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. हीच खरी आमच्या कामाची पोचपावती होती. साहेबांची कौतुकाची एक थाप आम्हाला पुढील काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरत असते. आता पुढील जबाबदारी आहे ती सावंतवाडी नगर परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याची. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन, हा मला विश्वास आहे. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे साहेबांचे स्वप्न साकार करणे, हे माझे कर्तव्य आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हा विश्वास देत त्यांना भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व त्यांना उत्तम आरोग्य लाभो, ही रामेश्वर चरणी प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -