नालासोपारा (वार्ताहर) : उन्हाळा येताच लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते; पण या वर्षी लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोच्या दराने लिंबांची विक्री होत आहे. त्यामुळे एक लिंबू सरासरी २५ रुपयांनी विकले जात आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वाढ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झाल्याने वसई-विरारमधील लिंबाचा दर तब्बल २८२ रुपये किलोवर पोहोचला आहे. लवकरच हा दर ३०० चा आकडा पार करेल, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. याआधी लिंबू ५० ते ६० किलो दराने विकले जात होते. यामुळे १० रुपयांना ३ मिळणारी लिंबांचा भाव आता थेट २५ रुपयांना एक इतका वाढला आहे.
घाऊक बाजारातही ५० ते ८० रुपये शेकडा दराने विकले जाणारे लिंबू किलोवर विकले जात असून जेवणात लिंबाची आवश्यकता भासत असल्यामुळे लिंबाला बाजारात चांगली मागणी आहे. लिंबाचे लोणचे दरवर्षी ६० ते ७० रुपये किलो दराने विकले जात होते; पण वाढते दर पाहता मागणीप्रमाणे लोणचे बनवत आहोत, असे एका महिला बचतगटाने सांगितले. दरम्यान, महागाईमुळे उपाहारगृहातून लिंबू गायब झाले आहे. शिवाय लिंबापासून तयार पदार्थांच्या किमतीतसुद्धा वाढ पाहायला मिळत आहे.
लिंबू सरबत १५ रुपये
उन्हाळ्यात उन्हाचा दाह कमी करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. यात सर्वाधिक लिंबू सरबत विकले जाते; पण आता शीतपेयापेक्षा लिंबू सरबत महागले आहे. जिथे शीतपेयाची छोटी बॉटल १० ते १२ रुपयांना मिळते, तिथे आता लिंबू सरबत १५ रुपयांना मिळत आहे. तथापि, शीतपेयापेक्षा लिंबू सरबत आरोग्यास लाभदायक असल्याने नागरिक खिशाला चिमटा देऊन लिंबू सरबतला पसंती देत आहेत.