संजय भुवड
महाड : जुलै २०२१च्या महाप्रलयानंतर स्थानिक प्रशासनाने राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या मदतीने सावित्री नदीपात्रात सुरू केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तसेच यासंदर्भात अत्यावश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याकामी आज शुक्रवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील हॉलमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पूर निवारण समिती सदस्यांकडून प्राप्त झाली आहे.
महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी या बैठकीचे आयोजन केले असून आयआयटी मुंबईने शासनाला दिलेल्या अहवालानुसार महाड पूर निवारण समितीने या अहवालासंदर्भातील केलेल्या अभ्यासानुसार, विविध मान्यवर अधिकाऱ्यांसमवेत तातडीने महाड पूर नियंत्रणासंदर्भात तातडीच्या उपाययोजनांची चर्चा होण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
आगामी पावसाळ्याचे ५० दिवस बाकी असताना स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनामार्फत या बैठकीसाठी येणाऱ्या विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीच बैठकीत उपस्थित राहावे, अशी अपेक्षा महाड पूर निवारण समिती सदस्यांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी येण्यास सांगावे, अशी विनंती केली असल्याचे समजते.
महाडवासीयांचे बैठकीकडे लक्ष
एकूणच आज होणाऱ्या या बैठकीकडे महाड शहरासह लगतच्या ९० गावांमधील नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नी प्रशासकीय पातळीवर येत्या ५० दिवसांत कोणता निर्णय घेण्यात येणार, हे स्पष्ट होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
मागेल त्याला फुकट गाळ देण्याचे धोरण
महाड पूर निवारण समिती सदस्यांसमवेत उपजिल्हाधिकारी रायगड यांसोबत झालेल्या बैठकीत सावित्री नदीपात्रातून काढण्यात येणारा गाळ हा मागेल त्याला मोफत देण्याचे धोरण ठरवले असून गाळ नेणाऱ्या वाहनाची व्यवस्था व नेण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. त्याचबरोबर शेडाव येथील पात्राबरोबरच भोई घाट व गांधारी नाका परिसरातील गाळ काढण्याचे काम येत्या २ दिवसांत सुरू होणार असून खासगी बेटाचे मालक असलम पानसरे यांनाही आपल्या बेटातील गाळ काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.