कल्याण (वार्ताहर) : पक्षी संवर्धनासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या योगदान फाऊंडेशनच्या वतीने पक्ष्यांसाठी पाण्याचा पॉट वाटप करत लोकांना पक्षीसंवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वाढत्या तापमानाचा परिणाम हा मानवासह निसर्गातील प्रत्येक जीवसृष्टीला होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांना पाणी मिळण्यासाठी खूप भटकंती करावी लागते.
काही प्रसंगी पाणी उपलब्ध न झाल्यास त्याचा जीवही जातो. याचाच विचार करत योगदान फाऊंडेशनच्या वतीने मातीच्या वॉटर पॉट वाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावे तसेच लोकांमध्ये संवर्धनाची आवड निर्माण व्हावी याकरिता योगदान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना मोफत मातीचे वॉटर पॉट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अजय शेलार, बिपीन अडांगले, एस. वी. ए. ग्रुपचे संस्थापक संदीप घुगे उपस्थित होते. तसेच योगदान फाऊंडेशनचे सेक्रेटरी रितेश कांबळे, सभासद सुनील शिंदे, पक्षी मित्र मनोज पांडे, अनंत बेलेकर, मनीष वरवटकर, मनाली वरवटकर आदी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकांनी या उन्हाळ्यात पक्ष्यांना सहज पाणी मिळण्याकरिता आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत पाण्याचे पॉट ठेवावे असे आवाहन करत पक्षी संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे असेही यावेळी सांगण्यात आले.