नवी मुंबई (वार्ताहर) : घणसोली विभाग कार्यालय परिसरातील घणसोली गावाच्या आजूबाजूला सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत; परंतु घणसोली गावातील मुख्य रस्त्याला फक्त दरवर्षी डांबराचा मुलामा दिला जात आहे. त्यामुळे वारंवार रस्त्याचे काम निघत आहे. यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा चुराडा होत आहे.
म्हणून सर्व प्रकारच्या सुविधायुक्त रस्त्याचे काम करावे, ही मागणी जोर धरत आहे. तर काहींनी ऑनलाइन पत्रव्यवहार करून सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी केली आहे. तसेच रस्ता वारंवार खराब होऊ नये यासाठी युटिलिटी डक्टची व्यवस्था प्राधान्याने करावी, अशी आग्रही मागणी संजय अंकल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सकपाळ यांनी केली आहे.
घणसोली नाका ते हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणापासून आजही वंचित आहे. पावसाळा आला की पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी केली जाते. पावसाळा आला की तीच कामे पुन्हा पुन्हा केली जात असल्याचे ऑनलाइन तक्रारीत म्हटले आहे.
घणसोली गावातील मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण व्हावे म्हणून आयुक्तांना ऑनलाइन पत्रव्यवहार केला आहे. हा रस्ता बनविताना युटिलिटी डक्ट अनिवार्य करावे. कारण इतर रस्त्यांना युटिलिटी डक्ट न बसविल्याने रस्त्याच्या शेजारील भाग खोदल्याने रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे. यामुळे पुन्हा पुन्हा रस्ता बनविला जात आहे. यात कोट्यवधी रुपये वाया जात आहेत.– गणेश सकपाळ, अध्यक्ष, संजय अंकल सामाजिक संस्था
चालू अर्थसंकल्पात घणसोली गावातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासंबंधी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे हे नागरी काम होईल. तसेच युटिलिटी डक्ट यंत्रणासुद्धा कार्यान्वित केली जाईल. -मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता, घणसोली