कोलंबो : श्रीलंकेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अभूतपूर्व आर्थिक संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी शुक्रवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांना व्यापक अधिकार देऊन राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.
आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसत असून पुढील धोका लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मी घेत आहे. १ एप्रिल २०२२ या तारखेने हा आदेश जारी करण्यात आला असून संपूर्ण देशात हा आदेश लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या हिंसाचारात एका दहशतवादी गटाचा सहभाग असल्याचे शुक्रवारी राष्ट्रपतींच्या प्रसिद्धी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी अनेक संघटित दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ झालेला हिंसाचार हे दहशतवादी कृत्य होते, असे श्रीलंकेचे वाहतूक मंत्री दिलम अमुनुगामा यांनी सांगितले, तर पर्यटन मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांनी हिंसाचारासाठी विरोधी पक्ष समगी जन बलवेगया आणि जनता विमुक्ती पेरामुना या दोन पक्षाशी संबंधित दहशतवादी गटास जबाबदार ठरवले. तसेच गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे हे घडले असून राष्ट्रपतींच्या जीवाला धोका होता, असे आरोग्य मंत्री केहेलिया रॅम्बुकेला म्हणाले.
राष्ट्रपती भवनाबाहेर शुक्रवारी हजारो नागरिकांनी निदर्शने केली. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपतींना पायउतार होण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या सरकारची धोरणे आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकांती भावना आहे. तर कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. काही संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवली. पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.
देशाच्या विविध भागांत आंदोलनाचा वणवा भडकला आहे. पोलीस आणि संतप्त जमावामध्ये चकमकी झडत आहेत. संपूर्ण देशात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना गेल्या काही काळापासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वीज संकटामुळे अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही डिझेल उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे. आर्थिक संकटामुळे कागदाचाही तुटवडा निर्माण झाला असून शाळा व कॉलेजच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासह लोकांची सर्वच बाजूंनी कोंडी झाली असून त्यातूनच असंतोषाचा उद्रेक झाला आहे. राजधानी कोलंबो, नुगेगोडा या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिम प्रांतातही मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक अजिथ रोहाना यांनी सांगितले.