नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या आपल्या कार्यक्रमाच्या पाचव्या भागामध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. पण करोनामुळे मी तुमच्या सारख्या माझ्या सहकाऱ्यांना भेटू शकलो नाही. आज होणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, कारण मोठ्या अंतरानंतर आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, सणांच्या दरम्यानच परीक्षा असतात. त्यामुळे सणांची मजा घेता येत नाही. पण जर परीक्षांनाच आपण सण बनवलं तर त्यात अनेक रंग भरले जातात.
पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मंचावर बोलावलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की पूर्ण कार्यक्रमादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये मला आत्मविश्वास कमी वाटला नाही. पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि शिक्षणविभागाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
पंतप्रधानांनी ऐकवली फिल्मी कथा
अभ्यास सकाळी करावा की संध्याकाळी, खेळण्याच्या आधी करावा की खेळण्यानंतर, उपाशीपोटी करावा की पोटभर जेवून, हे सगळे प्रश्न ऐकून त्यांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला एक चित्रपट आठवतोय, ज्यात रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीला मोठ्या बंगल्यात राहण्याची संधी मिळते. तिथे त्याला झोप येत नव्हती. म्हणून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे गाड्यांचा आवाज रेकॉर्ड करतो आणि परत येऊन तो आवाज ऐकून मग झोपी जातो. याचा आशय असा की आपल्याला आराम मिळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःचं मूल्यांकन करा आणि बघा की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केल्याने आराम मिळतोय.
परीक्षेला एक पत्र लिहा
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं की एक दिवस तुम्ही परीक्षेलाच पत्र लिहा. त्यांनी मिश्किल अंदाजात सांगितलं की, हे प्रिय परीक्षे असं लिहून पत्राची सुरूवात करा. पुढे लिहा की मी पूर्णपणे तयार आहे, हिंमत असेल तर माझी परीक्षा घ्या. अरे तू काय माझी परीक्षा घेणार, मीच माझी परीक्षा घेईन.
खेळल्याशिवाय तुम्ही खुलणार नाही
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की खेळल्याशिवाय तुम्ही खुलणार नाही. आपल्या प्रतिद्वंदीच्या आव्हानांचा सामना करणं आपण त्यातून शिकतो. पुस्तकं आपल्याला जे शिकवतात, ते आपण खेळाच्या मैदानातही शिकू शकतो. मात्र आता खेळण्याला शिक्षणापासून वेगळं करण्यात आलं आहे. पण आता बदल होत आहेत आणि आणखी बदल अवश्य होतील.
सोशल मीडिया आणि मोबाईल गेंमिंगच्या व्यसनापासून कसं दूर राहायचं?
पंतप्रधान मोदी म्हणाले की सोशल मीडिया आणि मोबाईल गेमिंगच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठीही उपाय आहे. जेवढी मजा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुंतून राहण्यात आहे, तेवढीच मजा स्वतःमध्ये गुंतण्यातही आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन ऑनलाईनच्या ऐवजी इनरलाईन राहायला हवं. एकाग्रतेने अभ्यास केला तर मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं.
ताणाला दूर कसं ठेवावं?
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मनात एक गोष्ट पक्की करून घ्या की परीक्षा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्या विकासाचा हा एक छोटा टप्पा आहे. या टप्प्यातून आपण आधीही गेलेलो आहोत. आपण याआधीही अनेकदा परीक्षा दिलेली आहे. जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो, तेव्हा येणाऱ्या परीक्षेसाठी हा अनुभव आपली ताकद बनते.
तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स पाहता?
पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मिश्किल सवाल
शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची थट्टाही केली. तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स पाहता, असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला.
ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित होतं, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केली असता, त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं. ते म्हणाले, ”माझ्या मनात एक गोष्ट येतेय की, तुम्ही विचार करा की, तुम्ही ऑनलाईन वाचत असता की रिल्स पाहत असता? मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही. पण तुम्हाला कळलं की मी तुम्हाला पकडलंय. खरंतर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल वर्गातही अनेकदा तुमचं शरीर वर्गात आहे, डोळे शिक्षकांकडे आहेत पण एकही गोष्ट कानात जात नसेल. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे. माध्यम कोणतंही असून माझं मन जर त्याच्याशी जोडलेलं आहे, त्यात मग्न आहे, तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही फरक पडतो.
मोदी पुढे म्हणाले, “युग बदलतं तसं माध्यमही बदलतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे, तेव्हा पुस्तके नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळी फक्त ऐकायचे आणि पाठांतर करायचे. अनेक पिढ्या हे असंच चालू होतं. पुढे काळानंतर पुस्तकं आली, ही उत्क्रांती होतच गेली. आज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणखी पुढे आलोय, आणखी सोपं झालं आहे. याला आपण एक समस्या न समजता एक संधी समजलं पाहिजे. पण हेही खरं आहे की आपण प्रयत्न करायला हवा की ऑनलाईन अभ्यासाला तुम्ही बक्षीस म्हणून समजायला हवं. तुम्ही जर शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आणि ऑनलाईन मिळालेल्या नोट्स या दोन्ही वाचल्या तर तुम्ही तुमच्या अभ्यासात आणखी भर घालू शकाल. दोन्ही एकत्र करून अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. शिक्षणाचा एक भाग आहे ज्ञानार्जन करणे.
ऑनलाईन मिळवण्यासाठी आहे आणि ऑफलाईन घडण्यासाठी आहे. मला किती ज्ञान मिळवायचं आहे, ते मी जगातल्या कानाकोपऱ्यातून मिळवेन आणि जे मला तिथे मिळालं आहे ते मी ऑफलाईन स्वतःला घडवण्यासाठी वापरेन”.
यावेळी पंतप्रधानांनी एक उदाहरणही दिलं. ते म्हणाले,”तुम्ही ऑनलाईन डोसा तयार कराल, मस्त डोसा तयार कराल पण त्याने पोट भरेल का? पण हेच जर डोसा कसा बनवायचा हे ऑनलाईन पाहिलं आणि प्रत्यक्षात डोसा बनवला तर त्याने पोट भरेल. ज्ञानाचंही असंच आहे. ऑनलाईनचा आधार घेऊन तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान तुमच्या जीवनात वापरायचं आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्याची अगदी मर्यादित साधनं होती, पण आता ती मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनला एक संधी समजा, तुम्हाला टूल्सही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता. अनेक मुलं या टूल्सच्या माध्यमातून स्वतःवर काही बंधनं घालून घेतात, ज्यांचा त्यांना फायदा होतो.