नवी दिल्ली (वृत्तसंस्था): वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी भेट घेतली. तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे वारकऱ्यांनी मोदी यांचा सत्कार केला.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी, वारकरी संप्रदायाची वीणा, चिपळ्या, उपरणे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन आणि गळ्यात तुळशी हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच मोदींना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देखील देण्यात आले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, असे आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. या शिष्टमंडळात भोसले यांच्यासह संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.