मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या हक्कभंग नोटीशीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहेत. अमरावती आणि मुंबईचे पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला लोकसभा सचिवालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती. शेतकऱ्यांचं वीज बील माफ करावं, अशी मागणी करत अमरावतीत मोर्शी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिवाळी कारागृहात काढावी काढली. त्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाचा काळ असल्यानं राणा दाम्पत्याला घरातच स्थानबद्ध करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पोलिस घेऊन गेले आणि पोलिस आयुक्त कार्यालयात बसविण्यात आले. माझ्यासोबत पोलिसांनी गैरवर्तन केले. एका लोकप्रतिनिधीचा अपमान केला, अशी तक्रार राणांनी संसदेत केली होती. त्यानंतर अमरावतीचे पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागेल.